कास पठारावर 'या' दिवशी सुरू होणार 'फुलांचा हंगाम'; फुलं पाहण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' रूपये

कास : जागतिक वारसा स्थळ आणि विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांचा सडा बहरण्यास अजून अवधी असून कासवर खरी रंगाची उधळण एक सप्टेंबर नंतरच पाहायला मिळणार आहे.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी मात्र गतवर्षी असलेल्या शंभर रुपये शुल्कात यावर्षी वाढ करण्यात आली असून यावर्षी प्रतिव्यक्ती दीडशे रुपये मोजावे लागणार आहेत. जरी शुल्क वाढ केली असली तरी यामध्ये यावर्षी साठी पार्किंग शुल्क व पार्किंग वरून पठारावर येण्यासाठी असणाऱ्या बसचे शुल्क माफ करण्यात आले आहे.




त्यामुळे या दरवाढीचा फटका कमी बसणार आहे. याबाबतचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आल्याचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी सांगितले. सध्या पठारावर चवर (रानहळद), पांढऱ्या रंगाची पंद, पाचगणी आमरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुल ही दिसू लागले आहे.

तरीही पावसाचे प्रमाण कमी होवून उन्हाची ताप पडली तरच विविधरंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे. कास पठार कार्यकारी समिती मार्फत सद्यस्थितीत पठारावर असणारे मंडप गुहा, बदारतळ, कास तलाव व्ह्यू पॉइंट या तीन पाॅइंटला पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे.

कास पठारावर फुलांची संख्या कमी झाल्याने विविध पर्यावरण वादी व अभ्यासक यांच्या अभिप्रायानुसार, पठाराला असणारी लोखंडी जाळी यावर्षी उन्हाळ्यात काढण्यात आली. पण, पर्यटक फुलांच्या क्षेत्रात कसेही प्रवेश करत असल्याने सध्या पठारावर समितीच्या वतीने फुलांच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी तात्पुरती तंगुसाची जाळी बसवण्यात आली आहे.

कास परिसरात सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असून दाट धुके, रिमझीम पाऊस व अंगाला झोंबणारा गार वारा असं मस्त वातावरण आहे. विकेंड व पंधरा ऑगस्टमुळे पर्यटकांची चांगलीच रेलचेल असून पर्यटक पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

धबधब्यांवर पर्यटनाला बहर..

कास परिसरातील भारतातील सर्वात उंच धबधबा असलेल्या वजराई धबधबा व एकीवचा धबधबा या दोन धबधब्यांवर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी होत असून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यास धबधब्यांचा सिजन वाढू शकतो.

पठारावर फुलांचा हंगाम अगदी तोंडावर असून कास पठार कार्यकारी समिती मार्फत पर्यटकांना सुलभ पर्यटन होण्यासाठी विविध सुविधा पुरविण्याबाबत तयारी सुरू आहे. एक सप्टेंबर पासून फुलांची परिस्थिती पाहून शुल्क आकारणी करून हंगाम सुरू करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने