मॉडेल स्कूलधर्तीवर आश्रमशाळांही होणार आदर्श; पहिल्या टप्प्यात 250 आश्रमशाळांचा समावेश

जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलच्या धर्तीवर राज्यातील अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळा ‘आदर्श’ करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये अत्याधुनिक लॅब, ग्रंथालय, कलाकक्षाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात १२१ आश्रमशाळा आदर्श (मॉडेल) घोषित करण्यात आल्या होत्या. त्यात आता वाढ करीत तब्बल २५० आश्रमशाळा आदर्श केल्या जाणार आहेत.




आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, नामांकित शाळा योजनांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. ५५० या अनुदानित आश्रमशाळा आहेत.

इंग्रजी शाळांच्या तुलनेत येथे मिळणाऱ्या सुविधांसह शैक्षणिक दर्जावर कायम टीकास्त्र केले जाते. त्यामुळे आश्रमशाळांना कायमच टीकेचे धनी व्हावे लागते. आश्रमशाळांवर असलेला हा शिक्का पुसण्यासाठी आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तसेच, शिक्षणातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे.

त्यासाठी आदिवासी विकास विभागाने आदर्श आश्रमशाळा करण्याचा निर्णय घेतला असून, २५० आदर्श आश्रमशाळा म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. शासकीय आश्रमशाळा मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित करीत असताना याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम, अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, कला व क्रीडा विभाग, अद्ययावत भोजनालय, सभागृह आदींचा समावेश असेल.

या शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सर्व प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार आहेत. शासकीय आश्रमशाळा आदर्श करण्याच्या दृष्टीने आता आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्‍यक ती कार्यकाही सुरू करण्यात आली.

अप्पर आयुक्तालयनिहाय आदर्श आश्रमशाळा

नाशिक- ११४, ठाणे- ४८, अमरावती- ४६, नागपूर- ४२

आश्रमशाळांना दिल्या जाणार या सुविधा

१) शैक्षणिक : सुस्थितीतील वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण व क्रीडा साहित्य, सोलर इन्व्हेंटर, कपडे धुणे व सुकविण्यासाठी पुरेशी जागा, संरक्षण भिंत आणि सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब लॅब, कॉम्प्युटर लॅब.

२) भौतिक : सुसज्ज शालेय इमारत, आयसीटी लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय, संगीत व कला कक्ष तसेच पुरेशी शौचालये, स्वतंत्र व सुसज्ज वसतिगृह, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्था, सुसज्ज भोजनालय व बहुउद्देशीय सभागृह, स्वच्छ व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने