राजधानीत महासत्तासंमेलन ; ‘जी-२०’साठी पाहुण्यांचे आजपासून आगमन

नवी दिल्ली : शनिवार-रविवारी ‘जी-२०’ गटातील राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेसाठी राजधानी सज्ज झाली आहे. परिषदेसाठी परदेशी नेत्यांचे आगमन आज, शुक्रवारपासून सुरू होईल. ३० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख, अन्य अभ्यागतांसह परदेशातून येणारे असंख्य अधिकारी, नागरिकांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सजली आहे.
प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या ‘भारत मंडपम’ या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्रामध्ये होणाऱ्या या परिषदेच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आढावा घेतला. वर्षभर ‘जी-२०’चे अध्यक्षपद भूषवल्यानंतर या शिखर परिषदेचे यजमानपद हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. या परिषदेसाठी ३० पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुख, युरोपियन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी, आमंत्रित-अतिथी देश तसेच, १४ आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ, जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अन्थनी अल्बनीज यांच्यासह ‘जी-२०’ समूहातील राष्ट्रप्रमुखांचे ‘भारत मंडपम’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वागत करणार आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे मात्र परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. परिषदेमध्ये अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि शाश्वत विकास अशा महत्त्वाच्या जागतिक विषयांवर चर्चा होऊन काही ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

द्विपक्षीय बैठका

शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज, शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ आणि संयुक्त अरब अमिरातींचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. मोदी-बायडेन यांच्यातील चर्चा प्रामुख्याने आर्थिक सहकार्य, हवामान बदल आणि युक्रेन-रशियाचे युद्ध या विषयांवर होणार असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने