मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्सची गरज आहे का? संतुलित आहार हा अजूनही सर्वोत्तम पोषक घटक का आहे?

जेव्हा ३१ वर्षांच्या मीडिया प्रोफेशनल असलेल्या श्वेता भसिन यांना नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात केस गळती होत असल्याचे जाणवले तेव्हा त्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले. कोणती कमतरता आहे हे शोधण्यासाठी तिच्या त्वचा शास्त्रज्ञांनी (dermatologist) तिला नेहमीच्या रक्ताच्या तपासणी करण्यास सांगितले. तिच्यामध्ये लोह, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ कमी असल्याचे आढळून आले. तिच्या त्वचारोग तज्ज्ञांनी त्वरित पोषण घटकांच्या वाढीसाठी तीन महिन्यांच्या सप्लिमेंट्सचा कोर्स करण्याचे सुचवले आणि नंतर तिला सूक्ष्म पोषक घटकांची पातळी( micronutrient levels) टिकवून ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्यास सांगितले.

पण, योग्य आहारासाठी खूप मेहनत आणि शिस्तीची आवश्यकता असल्याने तिने स्वत:च वैद्यकीय सल्ल्याशिवाय सर्व-उद्देशीय मल्टिव्हिटॅमिन ( all-purpose multivitamins) घेण्याचे ठरवले. तरीही तिला आराम मिळत नव्हता किंवा बरे वाटत नव्हते. मग तिला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि निद्रानाशाची समस्यादेखील निर्माण झाली. हे सर्व वैद्यकीय सल्ल्याशिवाय अनेक गोळ्या घेतल्याचा हा परिणाम आहे. “त्याचे कारण म्हणजे मल्टीव्हिटॅमिन किंवा कोणतेही पूरक आहार चांगल्या आहाराची जागा घेऊ शकत नाही. गोळ्या निरोगी आहाराला पूरक असतात, ते बदलू नका”, असे द्वारका येथील HCMCT मणिपाल हॉस्पिटलच्या पोषण आणि आहारशास्त्र सल्लागार वैशाली वर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.”
मुळात आपल्याला मल्टिव्हिटॅमिनची गरज आहे का?

पेशींची पुन्हा दुरुस्ती (tissue repair), हॉर्मोनल संतलून आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी, शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवण्यासाठी एक संतुलित आहार आवश्यक आहे जो फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य, शेंगा आणि लीन प्रोटीन्ससह सर्व पोषक घटकांनी समृद्ध असेल. तुम्ही जर योग्य आहाराचे सेवन केले तर तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनच्या सेवनाची आवश्यकता पडणार नाही. मल्टीव्हिटॅमिन्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होतात. पण, जर तुम्ही विचार न करता, डॉक्टरांचा सल्ला न घेता मल्टीव्हिटॅमिन्स बिनधास्तपणे सेवन केले तर तुम्हाला हायपरविटामिनोसिस होऊ शकतो.

मल्टीव्हिटॅमिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास काय होते?

शरीरात व्हिटॅमिन साठवण्याची क्षमता असामान्यपणे जास्त असते आणि त्यामुळे विषारी लक्षणे दिसून येतात आणि आरोग्यावर विविध परिणाम होऊ शकतात.

  • लोह जास्त प्रमाणात सेवन केल्यास उलटी, जुलाब किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. अतिप्रमाणात सेवन केल्याने काही लोकांची आरोग्य स्थिती बिघडू शकते. त्यामुळे ते कोमामध्ये जाऊ शकतात, रक्तदाब कमी होऊ शकतो आणि यकृत निकामी होऊ शकते.
  • कॅल्शिअमचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते, रक्तातील पीएच पातळी वाढू शकते आणि त्यामुळे मळमळ आणि उलटी किंवा मानसिक भ्रम किंवा ह्रदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.
  • व्हिटॅमिन डीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढू शकते.
  • व्हिटॅमिन एचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मळमळ, उलटी, चक्कर येणे आणि दृष्टी अंधूक होऊ शकते.

वाढत्या वयानुसार आपल्याला सप्लिमेंट्सची आवश्यकता आहे का?

होय. कारण वयाच्या ५५ किंवा ६० नंतर आपले शरीर अन्नातून मिळणारे पोषक घटक शोषून घेण्यास कमी पडते. हे पोटातील ॲसिड निर्माण होणे, एंजाइम प्रक्रिया आणि आतड्यांसंबंधी कार्यांच्या बदलांमुळे असे होऊ शकते. पण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मल्टीव्हिटॅमिनचे सेवन करावे. प्रत्येक व्हिटॅमिनचे प्रमाण तुमच्या रक्त तपासणीच्या अहवालावर आधारित असतात.

संसर्ग झाल्यानंतर किती काळ आपण मल्टिव्हिटॅमिन्स घ्यावे?

ताप, संसर्ग किंवा शस्त्रक्रियेनंतर जेव्हा शरीरात पोषक तत्वांचा असंतुलन होतो आणि रुग्णाची भूक कमी होते, तेव्हा डॉक्टर मल्टीव्हिटॅमिनची शिफारस करतात. मल्टीव्हिटॅमिन्स एक आधार प्रणाली म्हणून काम करतात. कारण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल प्रणालीवर ताण येतो, पचनाच्या समस्या होतात आणि शरीर तणावात असते. एकदा रुग्ण बरा झाला की हे मल्टीव्हिटॅमिनवर अवलंबून राहू नये आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

तुम्हाला प्रत्यक्षात शक्य असेल असे ध्येय निश्चित करणे आणि निरोगी आहाराचे सेवन करण्याची आवश्यकता आहे. विचार न करता कोणत्याही प्रकारच्या आहाराचे (Diet) पालन करू नका, विचार करून निर्णय घ्या. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवणे, घरी तयार केलेले अन्न खाणे किंवा योग्य वेळी अन्न खाणे आणि चांगली झोप घेणे अशा काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. दररोज चांगल्या सवयी जोपासण्यासाठी प्रयत्न केल्यास तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्यास मदत होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने