गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या स्क्रिन टाइममध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खास करून मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर वाढू लागला आहे. तासनतास मोबाईल आणि लॅपटॉपची स्क्रिन पाहत बसल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण होवू लागल्या आहेत.
मोबाईल आणि लॅपटॉपमधून निघणाऱ्या ब्लू लाइटमुळे म्हणजेच उजेडामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होत असल्यास दिसून आलंय. गेल्या काही वर्षात मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे कमी वयातच डोळ्यांचे आणि दृष्टीशी संबंधीत विविध आजार होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
या गॅजेट्समधून बाहेर पडणाऱ्या ब्लू लाइटमुळे झोपेवर परिणाम होवू लागला आहे. झोप न येणं किंवा डोळे कोरडे होणं यासोबत इतरही अनेक मानसिक आणि शारिरीक समस्या उद्भवू लागल्या आहेत.
लॅपटॉपवर काम करण्यासाठी किंवा मोबाईलच्या या ब्लू लाइटपासून डोळ्यांचं संरक्षण व्हावं याकरता अनेकजण ब्लू फिल्टर चष्मा वापरू लागले आहेत. जरी डोळ्यांचा नंबर नसला तरी डोळ्यांचं पासून संरक्षण व्हावं म्हणून देखील असे चष्मे वापरले जातात. मात्र या ब्लू फिल्टर चष्म्यामुळे खरचं डोळ्यांचा संरक्षण होतं का?
ब्लू फिल्टर चष्मांमुळे डोळ्याचं संरक्षण होतं असा चष्म्याची निर्माती करणाऱ्या अनेक ब्रँड कडून दावा केला जातो. मात्र यात नेमकं किती तथ्थ आहे.? कारण नुकत्याच संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात हा दावा फेटाळला आहे. लॅपटॉप किंवा मोबाईलमधून निघणाऱ्या वाईट प्रकाशापासून किंवा ब्लू लाइटपासून संरक्षण करण्यास ब्लू फिल्टर चष्मे प्रभावी नसल्याचं म्हंटलं आहे.
ब्लू लाइट डोळ्यांसाठी हानिकारक
ब्लू लाइटमुळे डोळ्याचं होणारं नुकसान कमी करण्याचा या चष्म्याचा म्हणावा तसा फायदा नाही असं या संशोधनातून समोर आलं आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपचा सतत वापर करणाऱ्या लोकांमध्ये ब्लू लाइटमुळे डोळ्यांवर ताण येणं किंवा डोळे कोरडे होणं अशा समस्या दिसून येतात. मात्र ब्लू फिल्टर चष्म्यामुळे देखील या समस्या कमी होत नाहीत असं अभ्यासामध्ये आढळलं आहे.
अभ्यासात काय आढळलं
क्रोकेन डेटाबेस ऑल सिस्टमॅटिक रिव्ह्यूव्हजमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोध अभ्यासानुसार १७ विविध देशांमध्ये काही वैद्यकीय चाचण्या आणि परिक्षणं करण्यात आली. यामध्ये ६१९ लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ब्लू फिल्टर चष्म्यामुळे डोळ्याचं नुकसान कमी होत हा दावा फेल ठरला आहे.
संशोधकांच्या मते खास करून कोरोनाकाळामध्ये लॉकडाऊन दरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर अधिक झाल्याने अनेकांमध्ये ब्लू लाइटमुळे डोळ्यांच्या विविध समस्या वाढू लागल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये अनेकजण ब्लू फिल्टर चष्म्याचा वापर करत होते.
लॅपटॉप किंवा मोबाईलच्या वापरासाठी अशा प्रकारच्या चष्म्याची आवश्यकता नसल्यासही अभ्यासकांनी स्पष्ट केलंय. तसंच ब्लू फिल्टर लेंन्सदेखील केवळ १० ते २५ टक्के ब्लू लाइट फिल्टर केली जाते.
डोळ्यांसाठी ही घ्या काळजी
ब्लू फिल्टर चष्मा किंवा लेन्स याच्या वापराएवजी जर तुम्ही सतत लॅपटॉपवर काम करत असाल तर डोळे निरोगी ठेवण्यासाठी अधूनमधून डोळ्यांचे व्यायाम करणं हा सर्वात चांगला पर्याय असल्यास अभ्यासकांचं मत आहे.
अशा प्रकारे केवळ ब्लू फिल्टर चष्माच्या वापराने तुमचे डोळे निरोगी राहणार नाहीत तर त्यासाठी डोळ्यांचे व्यायाम आणि योग्य आहारही गरजेचा आहे. शिवाय गरज नसल्यास स्क्रिन टाइम कमी करणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.