कोल्हापुरात कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व शस्त्रक्रिया सुविधा सीपीआरमध्ये सुरु होणार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाला यश

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कर्करुग्णांसाठी एक दिलासादायक वृत्त आले आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगावर (कॅन्सरवर) मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.  कर्करोगावरील उपचार सुविधेचा उद्घाटन समारंभ सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर येथे शनिवार,9 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील तसेच इतर शेजारी जिल्ह्यातील विविध आजाराचे रुग्ण येत असतात. सद्यस्थितीत विविध प्रकारच्या कर्करोगाच्या  रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारावर उपचाराची सुविधा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध नाही. तसेच या आजाराचा खर्च गोरगरिब रुग्णांना परवडणारा नाही.  कर्करोगावर उपचाराची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून शनिवार पासून आठवड्याच्या दर बुधवारी खोली क्र. ११९ बाह्यरुग्ण विभाग इमारत येथे सकाळी ९ ते १ या वेळेमध्ये बाह्यरुग्ण सेवा सुरु होणार आहे.

मोफत शस्त्रक्रिया

या विभागास भेट देणाऱ्या रुग्णांची आवश्यक ती तपासणी झाल्यानंतर रुग्णास गरजेनुसार आवश्यक त्या शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ज्ञांमार्फत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहामध्ये मोफत केल्या जातील. याकरीता कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूर यांच्याकडील कॅन्सर तज्ज्ञ मानद सेवेद्वारे उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने