ICC ODI World Cup 2023: पाकिस्तानी संघाला भारताचा व्हिसा मिळेना; बाबर सेनेची धडधड वाढली

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. १९ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येईल. यंदा भारताकडे स्पर्धेचं यजमानपद आहे. २९ सप्टेंबरपासून सराव सामने सुरू होणार आहेत. २०११ नंतर पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची संधी भारताला आहे. २०११ मध्ये भारतामध्येच विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती.

विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. भारतात येणाऱ्या सर्व संघांना व्हिसा मिळाला आहे. पण बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानी संघाला अद्याप भारत सरकारकडून व्हिसा मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघानं दुबईला जाऊन सराव करण्याचा प्लान रद्द केला आहे.
ईएसपीएनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी संघ विश्वचषक स्पर्धेपूर्वी दुबईत सरावाला जाणार होता. तिथून पाकिस्तानी संघ हैदराबाद गाठणार होता. आधी यूएई आणि मग भारत अशी योजना पाकिस्ताननं आखली होती. पण अद्याप तरी भारताकडून पाकिस्तानी संघाला व्हिसा मिळालेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डनं आठवड्याभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता. पण अद्याप तरी व्हिसा मंजूर झालेला नाही.

भारताकडे व्हिसा मिळाला नसल्यानं पाकिस्तानी क्रिकेट संघ २७ सप्टेंबरला दुबईच्या दिशेनं उड्डाण करेल. तिथून ते २९ सप्टेंबरला हैदराबादला न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळण्यात येतील. तोपर्यंत व्हिसा मंजूर होईल अशी अपेक्षा पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनाला आहे. भारतात येणाऱ्या अन्य सर्व परदेशी संघांना व्हिसा मिळालेला आहे. व्हिसा मिळण्यास होणाऱ्या विलंबाचा परिणाम पाकिस्तानी संघाच्या तयारीवर होऊ शकतो. गेल्या १० वर्षांत पाकिस्तानी संघ केवळ एकदाच भारत दौऱ्यावर आला आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानी संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात आला होता.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने