कोल्हापुरात शाही दसऱ्याच्या सोहळ्याला दिमाखात प्रारंभ

कोल्हापूर : यंदा कोल्हापूरचा शाही दसरा राज्य शासनाच्या सहकाऱ्याने साजरा होत आहे. यानिमित्त शाही मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. तर उत्सव प्रिय जनतेने ऐतिहासिक दसरा मैदानात गर्दी केली आहे. अवघ्या काही क्षणांमध्ये मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि राजघराण्यातील मान्यवरांच्या हस्ते ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळा होणार आहे. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम रंगणार आहे.

गेले नऊ दिवस मध्ये करवीर निवासिनी अंबाबाई तसेच दख्खनचा राजा जोतिबा येथे देवदर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. आज विजयादशमी. आजच्या दिवशी देवीच्या दर्शनाबरोबरच कोल्हापुरातील ऐतिहासिक शाही दसरा हा महत्त्वाचा प्रसंग आहे.म्हैसूर प्रमाणे कोल्हापूरचा दसरा हा सर्वत्र आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
यावर्षी तो शासन मदतीतून शाही स्वरूपात साजरा केला जात आहे. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, मावळते पालकमंत्री दीपक केसरकर, संयोजन समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

आज सायंकाळी भवानी मंडपातून श्री अंबाबाई देवीची पालखी, गुरु महाराजांची पालखी व छत्रपती देवस्थानाची पालखी सायंकाळी उत्साहात निघाली. या पालखी सोबत शाही लवाजम्याचा समावेश असून यात ध्वजवाहक घोडा, दहा घोड्यांचे पथक, दोन हत्ती, एक बग्गी (अब्दागिरी), त्यानंतर ३० मावळ्यांचे पथक, ६० खेळाडूंचे पथक, २०० पैलवान त्यानंतर तिन्ही पालख्या व शेवटी पुन्हा चार उंट असा लवाजमा असणार आहे. याबरोबरच ढोल पथक, लेझीम व धनगरी ढोल पथक सहभागी होवून मिरवणुकीला पारंपारिकतेची जोड आहे.

नवा राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर एन. सी. सी, एन.एस.एस, स्काऊटच्या २५०० विद्यार्थ्यांचे पथक स्वागताला उभे आहे. शाही मिरवणुकीच्या दोन्ही मार्गांवर फुलांचा सडा, रांगोळ्यांनी करवीरकर व पर्यटक हे श्रीमंत शाहू महाराजांचे स्वागत करीत आहेत. भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या १२ कमानी उभारल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने यावर्षी दसरा महोत्सवा अंतर्गत १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रम घेण्यात आले. आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना कोल्हापूरकरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने