पटपट जेवण करताय?मग, वेळीच सावध व्हा! अन्यथा ‘या’ आजारांना बळी पडाल

सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. वाढलेले प्रदूषण, बिघडलेली लाईफस्टाईल आणि संतुलित आहाराचा अभाव यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

रोजच्या व्यस्त शेड्युलमुळे तर अनेकांना जेवण करण्यासाठी ही वेळ नसतो. अशावेळी मग गडबडीत जेवण अनेक जण करतात. मात्र, हे गडबडीत जेवण केल्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हे कित्येकांच्या लक्षात येत नाहीत.

घाईमध्ये किंवा गडबडीत जेवण केल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्या निर्माण होतात? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.




जेवणाचे व्यवस्थित पचन होत नाही

घाईगडबडीत आणि पटपट जेवल्याने खाल्लेल्या जेवणाचे नीट पचन होत नाही. पटपट जेवल्याने खाल्लेले अन्न नीट चावले जात नाही. हे अन्न नीट चावले नसल्यामुळे त्याचे लाळेत रूपांतर होत नाही. ते फक्त गिळले जाते.

अन्न नीट चावून खाल्ल्यामुळे त्याच्यापासून लाळ तयार होते आणि या लाळेमध्ये एंजाएम्स मिळतात ते अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. शिवाय, पटपट खाताना आपण एकाचवेळी मोठ्या प्रमाणात अन्न खातो. जे पचण्यास कठीण जाते. अन्न नीट पचले नाही तर मग पचनाच्या समस्या निर्माण होतात.

वजन वाढते

झटपट आणि गडबडीत जेवण करण्याची सवय वजन वाढण्याला कारणीभूत ठरू शकते. तसेच, जेव्हा आपण घाईमध्ये जेवण करतो तेव्हा, आपली पचनक्रिया मंदावते. ही पचनक्रिया मंदावल्यामुळे आपल्या शरीरात आपोआप चरबी जमा होऊ लागते. ही चरबी साठत गेल्याने आपले वजन वाढू लागते.

या उलट हळू आणि सावकाशपणे जेवण केल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त अन्न खाण्यापासून रोखले जाते. जेवण नीट चावून खाल्ल्यामुळे ते व्यवस्थित पचते आणि पचनाची क्रिया सुलभ होते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते

पटपट आणि घाई-गडबडीमध्ये जेवण केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, हे अगदी खरं आहे. जेव्हा आपण पटपट जेवण करतो, तेव्हा शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता निर्माण होते. या कारणामुळे, आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जर तुम्ही असे पटपट जेवण करत असाल तर तुम्हाला मधुमेहाचा धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच, जर तुम्ही आधीपासूनच मधुमेहाचे रूग्ण असाल तर पटपट जेवण करणे वेळीच थांबवा, अन्यथा मधुमेहाचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे, अन्न नेहमी चावून आणि सावकाश खावे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने