दिवाळीत फराळ बनवताना फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स अन् बिनधास्त मारा ताव लाडू, चकली, चिवड्यावर!

देशभरात दिवाळी सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. घराघरांत फराळ बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनुसार लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी, शेवया असे अनेक खास पदार्थ तयार केले जात आहेत. त्यामुळे वर्षातील हीच वेळ असते, जेव्हा कुटुंब एकत्र येऊन दिवाळी फराळ, पारंपरिक मिठाई व चवदार पदार्थांचा आनंद घेते; तसा हा स्वादिष्ट फराळ नातेवाईक आणि शेजाऱ्यांबरोबर शेअरही केला जातो. पण, फराळ बनवणे वेळखाऊ असल्याने बरेच जण हल्ली रेडीमेड फराळ विकत घेतात. त्यामुळे वेळही कमी लागतो आणि खर्चही कमी होतो. पण, अशा फराळामुळे आरोग्यासंबंधीचे धोके वाढत आहेत.

परंतु, यंदा आरोग्यासंबंधीचे धोके टाळण्यासाठी आणि निरोगी दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही फराळ बनवताना काही हेल्दी टिप्स फॉलो करा. त्यामुळे तुम्हाला दिवाळीत आरोग्याची चिंता न करता, लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी अशा विविध पदार्थांवर बिनधास्त ताव मारता येईल. त्याबाबत पुण्यातील केईएम हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या मधुमेह युनिटमधील डॉ. सोनाली श्रीकांत वागळे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. सोनाली वागळे यांनी दिवाळीत निरोगी फराळ बनवण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स दिल्या आहेत; ज्यांच्या मदतीने तुम्ही कमी तेल, तूप आणि पिठाचे विविध प्रकार वापरून चविष्ट हेल्दी फराळ बनवू शकता.

हेल्दी फराळ बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

१) तेलाचा वापर कमी करा

फराळातील विविध पदार्थ बनवण्यासाठी डिप फ्राइंग करताना चांगल्या दर्जाचे आणि प्रक्रिया न केलेले खाद्य तेल वापरा. यावेळी तेलाचा वापरही कमी करा. पदार्थामधील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. सॅच्युरेटेड फॅट्स वापरताना डालडा किंवा वनस्पती तुपापेक्षा घरगुती गाईच्या दुधाचे तूप निवडा.

२) तळण्याऐवजी बेक करा

फराळात शेंगदाणे आणि डाळ वापरताना ते तळण्याऐवजी भाजून घ्या. शेव आणि चकली तळण्याऐवजी बेक करावेत.

३) वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरा

शेव बनवताना बेसनाऐवजी मूग डाळीच्या पिठाचा वापर करा. सोयाबीन आणि नाचणीचे शेव बनवून बघा. लाडू, करंजी व शंकरपाळ्या बनवताना त्यात मैद्याबरोबरच गव्हाचे पीठ वापरा; ज्यामुळे मैद्याचा वापर कमी होईल.

४) लाडूत सुक्या मेव्याबरोबर वापरा ‘हे’ पदार्थ

पौष्टिक लाडू बनण्यासाठी ओट्स, बिया, सुका मेवा, खजूर, बदाम, अक्रोड व मनुका वापरा.

५) साहित्य बदलून पाहा

चिवड्यासारख्या पदार्थात सुके खोबरे वापरण्यापेक्षा ताजे खोबरे वापरा. फराळात साखरेऐवजी गूळ किंवा खजुराचा वापर करा.

दिवाळीत निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स

१) हलका नाश्ता करा

सकाळ किंवा संध्याकाळी खूप हलका नाश्ता करा. या दिवसांत तुमचा नेहमीचा नाश्ता कमी कॅलरी पर्यायांमध्ये बदला.

२) कामाच्या ठिकाणी कमी कॅलरीजचे सेवन करा

कामच्या ठिकाणी एक ते दोन कपपर्यंत चहा किंवा कॉफीचे सेवन करा; ज्यामुळे २०० ते २५० कॅलरीज वाचवता येतील. अतिरिक्त १४५ कॅलरीज कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणाबरोबर थंड पेय पिणे टाळा.

३) स्टेप अप वर्कआउट्स

अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठी दिवाळीच्या आधी आणि नंतर तुमच्या वर्कआउट्स रूटीनमधील वेळ सतत वाढवत जा.

४) फायबर आणि पाण्याने समृद्ध अन्न खा

फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ सेवन करा.

५) प्रमाणात खा

मित्र आणि नातेवाइकांना भेट देताना विविध पदार्थांचा आनंद घेताना प्रमाणात फराळ, मिठाई खा. कमी कॅलरीजयुक्त फराळ, मिठाई, सुका मेवा व फळे खा.

६) रात्रीचे जेवण टाळा

संध्याकाळी नाश्ता केल्यानंतर रात्रीचे जेवण टाळा. कमी कॅलरीज असलेले पदार्थ खा. चपाती आणि भात न खाता, एक ग्लास ताक प्या. तुम्ही दिवसभर वेगवेगळा फराळ, मिठाई खाल्ली असेल, तर रात्रीचे जेवण घेणे शक्यतो टाळा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने