सावधान! येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

देशातील हवामान गेल्या आठवडाभरापासून मोठा बदल होत आहे. पहाटे आणि रात्री थंडी, तर दिवस ऊन असे वातावरण आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून येत्या ४८ तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा देखील अंदाज आहे.

देशातून मान्सून पूर्णपणे परतला मात्र, अजूनही तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत अंदमान-निकोबार बेट, केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.
तर पुढील सात दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, किनारी कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्तीसगड आणि ओडिशामधील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम हिमालयात तीन नोव्हेंबरपर्यंत हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने