६ डिसेंबर भारतीय क्रिकेटसाठी खूपच खास, एकाच दिवशी ५ बडे खेळाडू साजरा करतायत वाढदिवस

आज ६ डिसेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल ५ क्रिकेटपटूंचा जन्म झाला. यापैकी तिघे भारतात नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात खेळले. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा, यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग आणि कसोटीत त्रिशतक झळकावणारा करुण नायर आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या सर्व खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने अनेकवेळा देशाचा गौरव केला आहे.




रवींद्र जडेजा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज ३५ वर्षांचा झाला. ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रमध्ये जन्मलेल्या रवींद्र जडेजाने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. जडेजाने २००५ मध्ये आई लताबेनला गमावले. त्या सरकारी रुग्णालयात नर्स होत्या, यावेळी जडेजाने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण घरच्यांनी त्याला धीर दिला. जडेजाने सुरुवातीचे क्रिकेट महेंद्रसिंग चौहान यांच्याकडून शिकले.

जडेजा सुरुवातीला सीम गोलंदाजी करायचा, पण महेंद्रसिंगमुळेच तो फिरकी गोलंदाजी करू लागला. सुरुवातीला तो मुंबईमध्ये लोकल टूर्नामेंट खेळायला जात होता, तेव्हा त्याची आई लताबेन यांना भीती वाटत होती की, तो रात्री ट्रेनमधून फिरायला लागतो. तो झोपेत फिरायचा हे फक्त जडेजाच्या आई आणि बहिणीला माहीत होते. एका रिपोर्टनुसार, त्याची आई रात्री हात धरून झोपायची.

जसप्रीत बुमराह

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज ३० वर्षांचा झाला. ६ डिसेंबर १९९३ रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेला बुमराह भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) खेळतो. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहही क्रिकेटपासून दूर राहिला आणि विश्वचषकापूर्वी आयर्लंड दौऱ्यावर तो टीम इंडियात परतला.

जसप्रीत बुमराहचा क्रिकेटर बनण्याची कहाणी खूप संघर्षाची आहे. तो पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याची आई अहमदाबादमध्ये शिक्षिका होती. लहान वयातच वडिलांच्या निधनामुळे बुमराहच्या कुटुंबाला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. वयाच्या १४व्या वर्षी बुमराहने क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहिले. बुमराहसाठी त्याच्या आईला हे पटवून देणे सोपे नव्हते पण आईने आपल्या मुलाचे स्वप्न मान्य केले. त्यानंतर बुमराहला क्रिकेटर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर जगाला एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज मिळाला.

श्रेयस अय्यर

मुंबईचा हा फलंदाज आज २९ वर्षांचा झाला. श्रेयस अय्यरने भारताकडून आतापर्यंत १० कसोटी, ५८ एकदिवसीय आणि ५१ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यात त्यांच्या नावे अनुक्रमे ६६६, २३३१ धावा आहेत. श्रेयसने या विश्वचषकातही चमकदार कामगिरी केली होती. त्याने ११ सामन्यात ६६.२५ च्या सरासरीने आणि ११३.२४ च्या स्ट्राईक रेटने ५३० धावा केल्या. श्रेयसने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो १० वर्षांचा असताना सोसायटीत राहणाऱ्या सिनियर मुलांनी त्याला खेळण्याची संधी दिली नाही, खेळण्याची संधी मिळाली तरी तो आधी फिल्डिंग करायचा.

करुण नायर

करुण नायर मूळचा कर्नाटकचा असून त्याचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा वीरेंद्र सेहवागनंतर ३२ वर्षीय करुण नायर हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. मात्र, त्याला फारशा संधी न मिळाल्याने तो २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

त्याने कारकिर्दीतील केवळ तिसऱ्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले. मात्र त्यानंतर तो केवळ तीन कसोटी सामने खेळू शकला आहे. नायरच्या नावावर सहा कसोटी सामन्यांमध्ये ६२.३३ च्या सरासरीने ३७४ धावा आहेत. याशिवाय, त्याने दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील भाग घेतला, ज्यामध्ये त्याने एकूण ४६ धावा केल्या. करुण नायर आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता. तो पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, आरसीबी यांसारख्या संघांमध्येही खेळला आहे.

आरपी सिंह

रायबरेलीमध्ये जन्मलेला आरपी सिंह आज ३८ वर्षांचा झाला आहे. उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला धमाकेदार सुरुवात केली. २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैजलाबाद कसोटीत आरपीला पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात तो 'सामनावीर' ठरला होता. २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवण्यात आरपीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आरपीने १४ कसोटी सामन्यात ४० विकेट घेतल्या. डावातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ५/५९ होती. याशिवाय त्याने ५८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६९ आणि १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. निवृत्तीनंतर आरपी सिंग कॉमेंट्री विश्वात खूप नाव कमावत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने