राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : योगा, मल्लखांबमध्ये सुवर्ण यश कायम

 अहमदाबाद : प्रथमच समावेश करण्यात आलेल्या योगासन, मल्लखांब प्रकारातील यशामुळे ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांमध्ये भर पडली. मल्लखांबमध्ये अक्षय तरळ, तर योगासनात प्रज्ञा आणि सानिकाने सुवर्णपदक मिळविले. योगासनात वैभव श्रीरामे आणि पूर्वाने रविवारी अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदकाची कमाई केली.



ट्रायथलॉन, हॉकी, वुशू प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम राखली आहे. स्पर्धा संपण्यास अजून तीन दिवस असताना पदकतालिकेत महाराष्ट्राचे तिसरे स्थान कायम आहे. महाराष्ट्राची २९ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ५६ कांस्य अशी ११७ पदके झाली आहेत. सेनादल ५१ सुवर्णपदकांसह आघाडी टिकवून आहे. सेनादलाने ३३ रौप्य आणि २९ कांस्य अशी ११३ पदके मिळविली आहेत. हरयाणाची ३१ सुवर्णपदकांसह एकूण ९५ पदके असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.योगासनात प्रज्ञा आणि सानिकाने सुवर्ण कामगिरी केली. कलात्मक प्रकारातील दुहेरीत त्यांनी हे यश मिळविले. पूर्वा आणि प्राप्ती या बहिणी रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. योगासन प्रकारात महाराष्ट्राने आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सहा पदके मिळविली आहेत.

ओम वरदाई आणि मनन कासलीवालने पुरुषांच्या कलात्मक दुहेरी प्रकारात ११८.४५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. याच गटात दोन सुवर्णपदकांचा मानकरी ठरलेल्या वैभव श्रीरामने शुभमच्या साथीने १७२.२ गुणांसह कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्र संघाने दिवसभरामध्ये योगासनात चार पदकांची कमाई केली.

मल्लखांबमध्ये अक्षय तरळने सुवर्ण, तर शुभंकर खवलेने रौप्यपदक पटकावले. पुरलेला, टांगता आणि दोरीचा मल्लखांब अशा तीनही प्रकारांत एकत्रित सरस कामगिरी करताना अक्षयने २६.८५ गुणांसह सुवर्ण यश मिळविले. शुभंकरचे २६.७० गुण होत.सॉफ्टबॉल प्रकारात पुरुष संघाने विजयी घोडदौड कायम राखत गटात अव्वल स्थान मिळविले. महाराष्ट्राने पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशचा ९-०, दुसऱ्या लढतीत दिल्लीचा ८-० व तिसऱ्या लढतीत गुजरातचा ४-१ असा पराभव केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने