जपानमध्ये प्रदर्शित झाल्यावर ‘RRR’ने मोडला २४ वर्षांपूर्वीचा रजनीकांत यांचा ‘हा’ रेकॉर्ड

मुंबई : एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. केवळ देशातच नाही तर जगभरात या चित्रपटाचं कौतुक झालं. यंदाच्या ऑस्करवारीसाठीसुद्धा या चित्रपटाचं नाव चर्चेत होतं, पण ऑस्करवारी नशिबात नसली तरी ‘आरआरआर’ इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारात आणि चित्रपट महोत्सवात बाजी मारली.नुकताच हा चित्रपट जपानमध्येही प्रदर्शित झाला आणि तिथेही याने उत्तम कामगिरी केली. जपानच्या बॉक्स ऑफिसवरही ‘आरआरआर’ने इतिहास रचला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने रजनीकांत यांच्या चित्रपटालाही पिछाडीवर टाकल्याचं समोर आलं आहे. जपानमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ने रजनीकांत यांच्या २४ वर्षांपूर्वीच्या ‘मूथू’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे.



२४ वर्षं म्हणजे तब्बल २ दशकांपूर्वी रजनीकांत यांचा ‘मूथू’ हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तेव्हा जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने जपानमध्ये ४०० मिलियन जपानी येन (जवळपास २४ कोटी) एवढी कमाई केली होती. आता या चित्रपटाला मागे टाकत ‘आरआरआर’ने बाजी मारल्याचं स्पष्ट होत आहे.जपानच्या २०९ स्क्रिन्स, ३१ आयमॅक्स स्क्रिन्स आणि एकूण ४४ शहरांत प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ने रजनीकांत यांच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. अजून आकडेवारी हातात आली नाहीये, पण हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार ‘आरआरआर’ने हा २४ कोटीचा आकडा पार केला आहे. ‘आरआरआर’ने जगभरात ११०० कोटी इतकी कमाई केली आहे. याबरोबरच हा चित्रपट जपानसह चीनमध्येसुद्धा धुमाकूळ घालत आहे. सध्या या चित्रपटाचे निर्माते याच्या पुढील वर्षीच्या ऑस्करवारीसाठी तयारी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने