स्वप्न भंगले! पण रोनाल्डोच्या निवृत्तीबाबत संदिग्धता

कतार: पोर्तुगालसाठी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचे आपले स्वप्न पूर्णपणे भंगले आहे, अशा शब्दांत ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या भावना व्यक्त केल्या, परंतु आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली नाही.कतारमधील विश्वकरंडक स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा १-० असा पराभव केला, त्याचबरोबर रोनाल्डोनेही डबडबलेल्या डोळ्यांनी मैदान सोडले. ३७ वर्षीय रोनाल्डोची ही अखेरची विश्वकरंडक स्पर्धा असल्याचे सर्वत्र सांगण्यात येत आहे. या पराभवानंतर रोनाल्डोने सोशल मीडियावर एका मोठ्या पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या; मात्र त्याने थेट निवृत्तीबाबत भाष्य केले नाही.पुढची विश्वकरंडक स्पर्धा २०२६ मध्ये होईल १६ वर्षे पोर्तुगाल संघाची सेवा केल्यानंतर आता पुन्हा संघातून खेळायचे की नाही, याबाबात आताच न सांगता इतर गोष्टींचेही अवलोकन करायचे आहे, उतावीळपणे कोणत्या निर्णयावर येणे योग्य नाही, असे रोनाल्डोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



कधीही पाठ दाखवली नाही

तो पुढे म्हणतो, मला प्रत्येकाला सांगायचे आहे, की माझ्याबाबत बरीच काही भाकिते करण्यात आली, बरेच काही लिखाण करण्यात आले, परंतु पोर्तुगालबाबतचे माझे समर्पण कधीही यत्किंचितही कमी झाले नाही. प्रत्येक पोर्तुगिजाचे स्वप्न मी पुढे नेत होतो, मी कधीही माझे सहकारी किंवा देशाला पाठ दाखवली नाही.आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये रोनाल्डो हा सर्वाधिक (११८) गोल करणारा खेळाडू आहे. जागतिक स्पर्धांत पोर्तुगालला नेहमीच पुढे ठेवणे हे माझे स्वप्न होते. गेल्या १६ वर्षांतील पाच विश्वकरंडक स्पर्धांत ज्या जिग्गज खेळाडूंसह मी खेळलो आणि करोडो पोर्तुगिजांनी मला पाठिंबा दर्शवला, त्यांचा मी ऋणी आहे. माझ्याकडे असलेली सर्व गुणवत्ता मी मैदानावर सादर करत होतो, कधीही मागे पडलो नाही, दुर्दैवाने ही सर्व स्वप्ने शनिवारी संपुष्टात आली. आता तुम्ही यातून काय अर्थ काढायचा तो काढा, असेही रोनाल्डोने म्हटले आहे.

...त्या वेळी रोनाल्डो ४१ वर्षांचा

कतारमधील स्पर्धा आपली अखेरची विश्वकरंडक स्पर्धा असल्याचे रोनाल्डो अप्रत्यक्षपणे म्हणत असला आणि आंतरराष्ट्रीय निवृत्तीबाबत संधिग्धता व्यक्त करत असला, तरी दोन वर्षांनी होणाऱ्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत (युरो) तो खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर २०२६ मध्ये पुढची विश्वकरंडक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत होणार आहे, त्या वेळी तो ४१ वर्षांचा झालेला असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने