आदितीला तिरंदाजीत रौप्यपदक

सातारा: ऑलिंपिकमध्ये भारताचे आशास्थान मानल्या जात असलेल्या साताऱ्याच्या आदिती स्वामी हिने शारजा येथे झालेल्या आशियायी कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तिचा समावेश असलेला भारतीय महिला संघही दक्षिण कोरियावर विजय मिळवत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.आदिती ही सातारा तालुक्यातील शेरेवाडी गावची रहिवासी आहे. सध्या ती सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सावंत अन् सहायक प्रशिक्षक शिरीष ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली दृष्टी अॅकॅडमीमध्ये तिचा धनुर्विद्येचा नियमित सराव सुरू आहे.



गेले काही दिवसांपासून तिच्या यशाचा आलेख उंचावत आहे. त्यातच शारजा येथे झालेल्या आशियायी कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक कंपाउंड प्रकारात तिने रौप्यपदक पटकावले. सांघिक प्रकारात तिने परनीत कौर, प्रगती यांच्यासह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. या यशाबद्दल जिल्हा युवराज नाईक, दृष्टी सुजित शेडगे, सायली सावंत, सर्व पदाधिकारी, तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, जिमखानाप्रमुख विकास जाधव, विनायक भोई, शेरेवाडी ग्रामस्थ आदींनी तिचे अभिनंदन केले.


‘खेलो इंडिया’साठीही निवड...

सलग तीन आशियायी चषक स्पर्धेत पदक प्राप्त करणारी आदिती महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. पुढील महिन्यात मध्य प्रदेश येथे आयोजित ‘खेलो इंडिया युथ गेम्स’साठीही निवड झाली आहे.दक्षिण कोरिया, तैवान यासारख्या तिरंदाजी खेळात बलाढ्य मानल्या जाणाऱ्या संघांविरुद्ध विजयश्री खेचत केलेली सुवर्णपदकाची कमाई ही अभिमानास्पद ठरणारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने