चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर

पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह तीन जणांना पुण्याच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंडवडमध्ये ही शाईफेकीची घटना घडली होती. महापुरुषांविरोधात विधान केल्यानं चंद्रकांत पाटील यांना या घटनेला सामोरं जावं लागलं होतं.चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणानंतर प्रमुख आरोपी मनोज गरबडे याच्यासह तिघांवर विविध गुन्हे चिंचवड पोलिसांनी दाखल केले होते. यामध्ये सदोष मनुष्यवधाचं कलम ३०७ ही मनोजवर लावण्यात आलं होतं. तसेच विनापरवाना आंदोलन केल्याचं कलमही त्याच्यावर लावण्यात आलं होतं. यांपैकी कलम ३०७ लावण्यावरुन बराच गदारोळ झाल्यानं काल पोलिसांनी हे कलम मागे घेतलं होतं.



दरम्यान, ९ डिसेंबर रोजी पैठण इथं संत विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल कथीत वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले होते, शाळा-विद्यापीठं सुरु करण्यासाठी सरकारवर अवलंबून का राहता? या देशात शाळा कोणी सुरु केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी या शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करण्यासाठी सरकारनं अनुदान दिलं नाही. यासाठी त्यांनी लोकांकडं भीक मागितली. मी शाळा चालवतोय मला पैसे द्या, असं ते म्हणाले. हे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या गळ्यातील उपरण काढून याची कृती करुन दाखवली.

त्यांच्या या विधानामुळं आणि कृतीद्वारे त्यांनी महापुरुषांचा अपमान केल्याची भावना लोकांमध्ये उफाळून आली. त्यानंतर राज्यभरातून चंद्रकांत पाटीलांना लोकांच्या रोषाला समारं जावं लागलं. विविध सामाजिक संघटना, राजकीय व्यक्तींनी देखील पाटील यांना जाब विचारला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरीही व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याच रोषातून पाटील यांच्यावर पुण्यातील तरुणांकडून शाईफेकीची घटना घडली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने