“मी कार्यक्रम बंद करणार नाही कारण…”, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

मुंबई: लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. अशाच एका कार्यक्रमात गौतमीचा डान्स बघायला आलेल्या प्रेक्षकाचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला होता. याप्रकरणी गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा असी मागणी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती. 



गौतमीच्या एका लावणी कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावर गौतमीने भाष्य केलं आहे. ‘टीव्ही९ मराठी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने स्पष्टीकरण दिलं आहे. “ग्रामीण भागातील प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. लोकांच्या प्रेमामुळं मी आज इथे आहे. मी एक कलाकार आहे. गावोगावी जाते आणि कार्यक्रम सादर करते. सुरुवातीला काही चुका झाल्या असतील. पण, आता सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे”, असं ती म्हणाली.

गौतमी पाटीलची महत्त्वाकांक्षा काय आहे? पुढे ती काय करताना दिसणार आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सध्या मला गाण्यांसाठी विचारणा होत आहे. माझा चित्रपटही येत आहे. आणखी चित्रपट व गाणी आली तर मी नक्कीच करेन. माझे कार्यक्रमही होतच राहतील. ते मी बंद करणार नाही”.लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचे लावणी कार्यक्रमातील अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विभत्स हावभाव व भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून लावणी डान्स करतानाचा तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने