शानदार विजयानंतरही भाजप नेत्यांमध्ये नाराजी; पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर!

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मॅजिक पुन्हा चाललं असून, सलग सातव्यांदा इथं कमळ फुललं आहे. विधानसभेच्या 182 जागांपैकी भाजपला दोन तृतीयांश पेक्षा जास्त विक्रमी 156 जागांवर विजय मिळाला आहे.काँग्रेसला  17 जागांवर समाधान मानावं लागलं. तर, आम आदमी पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या. दुसरीकडं दिल्ली महापालिकेपाठोपाठ हिमाचल प्रदेशमध्ये भाजपनं सत्ता गमावलीय. हिमाचलमध्ये 68 पैकी 40 जागा जिंकत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. इथं भाजपला 25 जागांपर्यंतच मजल मारता आली. मात्र, एकीकडं गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा होत असतानाच, भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.




दरम्यान, नेत्यांच्या नाराजीमुळं भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. माजी राज्यमंत्री नानू वनाणी  यांनी खुलं पत्र लिहून पक्षातील कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. गुजरात भाजपमध्ये लहान कार्यकर्त्यांची काळजी घेणारं आता कोणीच नाहीये. मी सध्याच्या परिस्थितीबद्दल खूपच अस्वस्थ आहे, असं त्यांनी म्हटलंय.वनाणी यांनी पत्रात पुढं लिहिलंय, '2022 च्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांचा जो उत्साह पाहिला, तो यापूर्वी कधीच अनुभवला नाही. पत्रात वनाणी यांनी कमी मतदानाबाबत, तसंच भाजपच्या कार्यपद्धतीवरही चिंता व्यक्त केलीय. पक्षानं आपल्या कार्यशैलीचा आढावा घेण्याची गरज आहे. पक्षात कागदावरच सगळा खेळ चालत आहे. मात्र, या कागदी अहवालांपेक्षा जमिनीवरील वास्तव फारच वेगळं आहे. पक्षाच्या जीवावर काही व्यक्ती खूप शक्तिशाली बनल्या आहेत. मात्र, पक्षानं त्यांना शरण जाणं चांगलं लक्षण नाहीये. कारण, यामुळं कार्यकर्त्यांचं मनोबल खचतं.'

भाजपच्या अन्य नेत्यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले आहेत. कांकरेजमधून पराभूत झालेले कीर्तीसिंह वाघेला  म्हणाले, 'स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळं मला अपयश आलं. जे पक्षाचे सदस्य पंचायत निवडणुकीतही जिंकू शकत नाहीत, ते तिकिटांची मागणी करत होते. त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आणि आमचं नुकसान केलंय.' सोमनाथमधून पराभूत झालेले मानसिंह परमार  म्हणाले, 'काही देशद्रोही निघाले. त्यांना पक्ष माफ करणार नाही.' तर, पाटणमधून पराभूत झालेल्या राजुल देसाई यांनी स्थानिक नेते आणि पालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने