रंकाळा तलावाच्या संवर्धनास हवे प्राधान्य

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेने प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ सुशोभीकरणाची विकासकामे न करता संवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यायला हवे. कोल्हापूरचा हा ऐतिहासिक ठेवा कायमस्वरूपी जपण्यासाठी सर्वांनीच योगदान देण्याची आवश्यकता आहे.रंकाळा विकासासाठी यापूर्वी निधी कमी उपलब्ध व्हायचा. मात्र, गेल्या दहा वर्षांत रंकाळा विकासकामांसाठी विविध योजनांतून निधी मिळत आहे. हा निधी सुशोभीकरणावरच अधिक खर्च होऊ लागला आहे. मूळ रंकाळ्याच्या संवर्धनाची कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे. तलाव म्हटले की पाणी हा महत्त्वाचा घटक असतो. मात्र, या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे पाणीच प्रदूषित झाले आहे. पाणी प्रदूषण हेच तलावाचे मूळ दुखणं आहे. त्यामुळे पाणी प्रदूषण दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

शाम हाऊसिंग सोसायटीजवळील नाला पावसाळ्यात भरभरून थेट रंकाळ्यात वाहत असतो. याकडे पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. येथे बांधलेल्या पंप हाऊसची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे शाम सोसायटी व देशमुख हॉल येथून रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे. तात्पुरती मलमपट्टी न करता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी. रंकाळा तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात दिवसेंदिवस अधिक अडकत आहे. तलावाच्या सभोवार काठाने सर्वत्रच हातगाड्यांचे अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.






हे आवश्‍यक...

  • सांडपाणी मिसळणे रोखावे, पाणी प्रदूषण दूर करावे.

  • रंकाळ्यासभोवती संरक्षण कठडे व्हावेत. यामुळे रंकाळ्याची हद्दही कायम होईल व अतिक्रमण होणार नाही.

  • पाटबंधारे विभागाची जागा हस्तांतरित व्हायला हवी

  • रंकाळा परिसरात सायलेंट झोनची (शांतता क्षेत्राची) अंमलबजावणी करावी.

  • रंकाळा परिसरातील अतिक्रमणे दूर करावीत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने