अंत जवळ आलाय... मेस्सी अर्जेंटिनाने फायनल गाठल्यावर काय म्हणाला?

कतार : फिफा वर्ल्डकप 2022 च्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात अर्जेंटिनाने झुंजार क्रोएशियाचा 3 - 0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याचे बोलले जात आहे. या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना अंतिम फेरीत पोहचली. यानंतर मेस्सीने अर्जेंटिनाच्या वृत्त संस्थेशी बोलताना आपल्या निवृत्तीबाबत एक मोठे वक्तव्य केले.स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने 34 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल करत अर्जेंटिनाला खाते उघडून दिले होते. मेस्सीचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील पाचवा गोल होता. मेस्सीने एक फुटबॉलपटू म्हणून सर्व काही साध्य केलं आहे. मात्र त्याच्या शिरपेचात आता फक्त वर्ल्डकप ट्रॉफीचा तुरा खोवणे बाकी आहे. 2014 मध्ये अर्जेंटिना फायनलमध्ये पोहचली होती. मात्र मेस्सीचे स्वप्न थोडक्यात हुकले. आता 2022 मध्ये पुन्हा एकदा मेस्सीच्या अर्जेंटिनाने अंतिम फेरी गाठली.



फायनल गाठल्यानंतर 35 वर्षाचा मेस्सी पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, 'माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा फायनल खेळून संपणार आहे याबाबत मी खूप खूष आहे. पुढचा वर्ल्डकप खूप वर्षांनी होणार आहे. मला नाही वाटत की मी पुढचा वर्ल्डकप खेळू शकेन. माझा वर्ल्डकपमधील प्रवास हा उत्तमरित्या संपणार आहे.'मेस्सी वैयक्तिक रेकॉर्डबद्दल बोलताना म्हणाला की, 'रेकॉर्ड्स खूप चांगले आहेत मात्र सांघिक उद्दिष्ट साध्य करणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. आमच्या दृष्टीने ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. आम्ही फक्त एक पाऊल मागे आहोत. आम्ही सर्वस्व पणाला लावून लढलो आहे. यावेळी वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही सर्व काही पणाला लावू.'


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने