चीनविरोधात अमेरिकेची आक्रमक भूमिका; म्हणालं, भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही..

अरुणाचल प्रदेश:  अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरजवळ भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेनं पाठिंबा दर्शविलाय. याबाबत पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर  यांनी एक निवेदन जारी केलंय.आम्ही आमच्या सहयोगी देशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेवर ठाम राहू. भारतानं ज्या प्रकारे परिस्थिती हाताळलीय, त्या प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा राहिल. त्याचबरोबर अमेरिका भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे, असं रायडर यांनी स्पष्ट केलं.



पॅट रायडर पुढं म्हणाले, चीन हुकूमशाही पद्धतीनं सीमेवर आपले सैन्य तैनात करून तथाकथित लष्करी पायाभूत सुविधा उभारत आहे. सध्या चीन अमेरिकेच्या मित्र आणि भागीदारांविरुद्ध आक्रमक होताना दिसत आहे. एलएसीनंतर चीन आता भारताशिवाय इतर देशांसाठी, तसंच सागरी सीमेवर मोठं आव्हान बनत आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चिनी सैन्याची उपस्थिती चिंतेची बाब आहे, असंही त्यांनी सांगितलं.मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) पत्रकार परिषदेत भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावर बोलताना व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितलं की, 'अमेरिका परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. दोन्ही बाजूंनी विवादित सीमांवर चर्चा सुरू आहेत. आम्ही परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण करत आहोत.'

9 डिसेंबरला भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक

9 डिसेंबरला अरुणाचल प्रदेशाच्या तवांग प्रदेशातील यांगत्से इथं एलएसीच्या बाजूनं चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) सैन्याचा जमाव दिसला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी चिनी सैन्याला माघार घेण्यास सांगितलं आणि त्यांना पुढं येण्यापासून रोखलं. यानंतर झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चकमक झाल्यानंतर लगेचच दोन्ही सैन्य आपापल्या भागात परतले. चिनी सैनिकांनी अचानक केलेल्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं सांगण्यात येत आहे. भारताकडून 20 सैनिक जखमी झाले, तर जखमी चिनी सैनिकांची संख्या दुपटीनं अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने