उदय भाई आणि मजनू भाई यावेळी देणार देशभक्तीचा डोस..आर्मी ऑफिसर्सकडून घेणार ट्रेनिंग

मुंबई: बॉलीवूडचा सगळ्यात प्रसिद्ध विनोदी सिनेमा 'वेलकम' च्या चाहत्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. निर्माता फिरोज नाडीयादवाला यांनी 'वेलकम ३' च्या रिलीजचा प्लॅन आणि टायटल विषयी माहिती दिली आहे. तसंच, सिनेमाचं शूट कधीपासून सुरू होणार आहे तसंच यावेळी देशभक्तीचा डोस सिनेमातून दिला जाईल असं देखील फिरोज नाडियादवाला यांनी सांगितलं आहे.अक्षय कुमार,कतरिना कैफ,नाना पाटेकर आणि अनिल कपूर अभिनित 'वेलकम' २००७ मध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर सिनेमानं दमदार कमाई केली होती आणि सिनेमा जनमानसातही प्रसिद्ध झाला होता. मीम्सच्या जगात तर आजही हा सिनेमा डिमांडवर आहे. या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये २०१५ मध्ये जॉन अब्राहम,श्रुती हासन,नसिरुद्धिन शहा आणि डिंपल कपाडिया असे कलाकार होते. नाना पाटेकर आणि अनिल कपूर सीक्वेलमध्ये देखील उदय शेट्टी आणि मजनू भाई बनून नजरेस पडले होते.फिरोज नाडियादवालाने 'वेलकम ३' संदर्भातील आपले जे प्लॅन सांगितले आहेत ते खूपच एक्सायटिंग आहेत. ते ऐकून तरी वाटत आहे की या फ्रॅंचायजीच्या या तिसऱ्या सिनेमाला ते खूप ग्रॅंड पद्धतीनं समोर आणणार आहेत.

एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत फिरोज यांनी सांगितलं की, ''वेलकमच्या या तिसऱ्या भागाचं नाव 'वेलकम टू द जंगल' असं असणार आहे. सिनेमातील भूमिकांविषयी बोलताना फिरोज म्हणाले की,''या भागातही मोठी तगडी स्टारकास्ट असणार आहे. सगळेच मुख्य कलाकार अॅक्शन करताना दिसतील ,ज्यात अभिनेत्री देखील सामिल असणार आहेत''.सिनेमाच्या कहाणी विषयी सांगताना फिरोज यांनी सांगितलं की,''वेलकम टू द जंगल' मध्ये धमाल विनोद आणि फु्ल्ल ऑन एन्टरटेन्मेंटचा डोस असणार आहे,ज्यामुळे खरं तर वेलकम ओळखला जातो. पण यावेळी सगळा ड्रामा मिलेट्री अॅक्शनच्या पार्श्वभूमीवर रंगलेला पहायला मिळणार आहे''. फिरोज नाडियादवाला पुढे म्हणाले,''या सिनेमात अॅक्शनचा धमाका असणार आहे. आम्ही 'हुये' हेलिकॉप्टर यासाठी वापरणार आहोत. याची प्रॉडक्शन व्हॅल्यू आणि भव्यता अशी असेल की आजपर्यंतच्या भारतीय सिनेमात कधीच कोणी पाहिली नसेल. यासोबतच 'वेलकम ३' मध्ये देशभक्तीचा स्पेशल टच असणार आहे''.






 नाडियादवाला सिनेमासाठी माजी आर्मी ऑफिसर्सचं सहाय्य घेणार आहेत जे बंदूका, RPG आणि मिसाइल या गोष्टी कशा हॅंडल करायच्या ते सांगतील.शूटच्या लोकेशनविषयी बोलताना फिरोज म्हणाले की,''या सिनेमाला जम्मू आणि काश्मिर तसंच युरोपच्या काही भागांमध्ये शूट केलं जाईल,जिथे दाट जंगलं आहेत. हे सगळं शूटिंग पूर्णपणे त्या- त्या लोकेशनच्या हवामानावर अवलंबून असेल''.फिरोज यांनी हे देखील नमूद केलं की ग्रॅंड स्केलवर सिनेमा बनवत असलो तरी सिनेमाची स्क्रीप्ट आणि त्यातील महत्त्वपूर्ण फॅक्टर्सलाही तितकंच महत्त्व दिलं जाईल. त्यांनी सांगितलं की,''पैशामुळे सिनेमा तर बनेल मोठा,पण चांगला सिनेमा बनवण्यासाठी कोणती मदत मिळत नाही,मेहनत आपल्यालाच करावी लागते. आणि मला बेस्ट सिनेमा बनवायचा आहे''.सिनेमाच्या शूटला पुढील वर्षापासून सुरुवात होणार असल्याची माहिती देखील फिरोज नाडियादवाला यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने