तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

मुंबई: अवतार पाहायला जाताय तर भलेही तुम्हाला तिकिटाचे दर जास्त दिसतील, तेव्हा प्रश्न पडेल की एवढे पैसे खर्च करुन हा चित्रपट आपण हा चित्रपट पाहावा की नाही, पण एक गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते ती म्हणजे बिनधास्तपणे हा चित्रपट पाहायला जा. दुसरं म्हणजे तुमचे तिकिट कितीही रुपयांचे का असेना हा चित्रपट तुम्हाला खूश केल्याशिवाय राहणार नाही. अवतार तुम्हाला रंगवून, गुंगवून ठेवण्यात शंभर टक्के यशस्वी झाला आहे.आपल्याकडे खिरापतीसारखे चित्रपट प्रदर्शित होतात. एकाच चित्रपटाचा सिक्वेल हा फार तर तीन ते चार वर्षांनी येतो. मात्र दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी तब्बल तेरा वर्षांनी अवतारचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एवढी वर्षे कॅमेरुन यांनी का घेतली याचे उत्तर तुम्हाला अवतार पाहिल्यानंतर नक्की भेटेल. आणि तुम्हीही म्हणाल दिग्दर्शकाच्या मेहनतीला रंग आला आहे. त्यांनी केलेले कष्ट एवढे कमालीचे प्रभावी आहेत की तुम्ही सव्वा तीन तास मोठ्या पडद्यासमोरुन हालणार नाही. आपल्यासारखी माणसं स्क्रीनवर दिसत नसताना एका वेगळ्याच जगाचे साक्षीदार आपण होऊन जातो आणि त्यात मनसोक्त मुशाफिरी करु लागतो.




जबरदस्त डिटेलिंग... हा अवतारचा एक मोठा प्लस पॉईंट म्हणावा लागेल. तुम्ही जे काही पडद्यावर पाहता आहात हे सत्यच आहे असं तुम्ही ठाम विश्वासानं म्हणू लागता.एव्हाना कॅमेरुन तुम्हाला तसे म्हणायला लावतातच. त्यात कोणतीही बळजबरी नाही. तुम्ही अवतारला ग्रेट म्हणू लागता. त्याचे कारण त्यातील त्या कथेतील जिवंतपणा, संवेदनशीलता दिग्दर्शकानं शेवटच्या फ्रेमपर्यत जपून ठेवली आहे. याठिकाणी मागील भागातील कथा आणि या भागातील कथानक यांची तुलना करण्याचा हेतू अजिबात नाही. मुळातच या परिक्षणामध्ये कथानक सांगायचे नाही तर चित्रपट का पाहणं गरजेचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

पहिल्या फ्रेमपासून स्क्रिनचा तो ब्ल्युईश टोन तुमच्या मनाची पकड घेतो ती शेवटच्या फ्रेम पर्यत. आपल्याला पँडोऱ्याची स्वप्नं पडू लागतात. आणि आपण त्या पँडोऱ्यावरचेच आहोत की काय असं वाटू लागतात. कॅमेरुन यांनी पहिल्या भागात देखील कुटूंब, एकत्र कुटूंबाचे महत्व आणि त्याची जबाबदारी या साऱ्या गोष्टींवर मार्मिकपणे भाष्य केले होते. या भागातही त्यानं तो धागा सोडलेला नाही. त्याच सुत्राभोवती अवतार २ चे कथानक फिरताना दिसते. अवतारच्या पहिल्या भागातील कर्नल जिवंत आहे. त्याच्या मनात सलीचा सूड घेण्याची भावना कायम आहे. सलीनं आता पँडोरावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. त्याचं कुटूंब मोठं आहे. आपल्या कुटूंबाला कुणी इजा पोहचविण्याचा प्रयत्न केल्यास त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची आपली तयारी आहे असे सली निक्षून सांगतो आहे.

कर्नलला काही करुन त्याला मारायचेच आहे. आपल्याच अस्तित्वासाठी आणि पँडोराला धोका झालेल्या सलीला टिपण्यासाठी मोर्चाबांधणी सुरु कर्नलनं केली आहे. हे सगळं कशापद्धतीनं घडतं, सलीला पँडोरा सोडून कुठे जावं लागलं, त्या दरम्यान त्याची आणि त्याच्या कुटूंबाची होणारी होरपळ, त्यांना दुसऱ्या समुहात गेल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरं, यासगळ्यात दिग्दर्शकानं आपल्याला मानवी समुह, संस्कृती, नातेसंबंध, संवाद, भावभावना, हे सारं प्रभावीपणे कॅमेऱ्याच्या मदतीनं टिपलं आहे. पँडोरा हे निसर्गाशी कसे जो़डले गेले आहे हे त्यानं फळं, फुलं, प्राणी आणि समुद्र यांच्या पद्धतीनं समजावून सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने