अटीतटीच्या सामन्यात भारताने वेल्सचा केला पराभव; आता क्रॉस ओव्हरमध्ये न्यूझीलंडशी गाठ

दिल्ली:  हॉकी वर्ल्डकप 2023 मध्ये आज भारत आणि वेल्स यांच्यात सामना रंगला. ग्रुप D च्या या सामन्यात भारताने वेल्सचा 4 - 2 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. मात्र गोलफरकामुळे इंग्लंड अव्वल तर भारत दुसऱ्या स्थानावर राहिला. आता भारताचा क्रॉस ओव्हरमध्ये न्यूझीलंडसोबत सामना होणार आहे.भारताकडून आकाशदीपने 2 तर समेशर सिंग आणि हरमनप्रीतने प्रत्येकी 1 गोल केला. तर वेल्सकडून गॅरेथ फ्यरलाँगने 42 व्या मिनिटाला भारतावर गोल करत खाते उघडले. पाठोपाठ जेकब ड्रॅपरनेही गोल करत भारताचे टेन्शन वाढवले होते.



भारत आणि वेल्स यांच्यातील महत्वाच्या सामन्याचे पहिले क्वार्टर हे गोलविना गेले. दोन्ही संघांनी पहिल्या 15 मिनिटात जोरदार चढाया केल्या मात्र कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. शेवटी पहिले क्वार्टर हे 0 - 0 असे बरोबरीत राहिले.दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला 21 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली. हमनप्रीतने पेनाल्टी कॉर्नरवर शमशेर सिंगला एक उत्कृष्ट ड्रॅग फ्लिक दिला. यावर शमशेर सिंगने वेल्टच्या गोलजाळीचा अचूक वेध घेत भारताचे गोलचे खाते उघडले.तिसऱ्या क्वार्टरमध्ये वेल्सने गोलची परतफेड करण्यासाठी चांगला जोर लावला. मात्र सामन्याच्या 32 व्या मिनिटालाच भारताच्या आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करत भारताची आघाडी 2 - ० अशी नेली. मनदीप सिंगने डीमध्ये आकाशदीपला चांगला पास दिला होता. 

त्याच्या जोरावर आकाशदीपने वेल्सवर दुसरा गोल डागला.मात्र भारताच्या या आनंदावर वेल्सच्या गॅरेथ फ्यरलाँगने पाणी फेरले. त्याने 42 व्या मिनिटाला भारतावर पहिला गोल डागला. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटात जेकब ड्रॅपरने गॅरेथ फ्यरलाँगच्यात पासवर उत्कृष्ट गोल करत सामना 2 - 2 असा बरोबरीत आणला.चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने सुरूवातीपासूनच बरोबरीची कोंडी फोडून आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला पहिल्याच म्हणजे 45 व्या मिनिटाला यश आले. आकाशदीपने भारताचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल डागला.त्यानंतर हरमनप्रीत सिंगने देखील पेनाल्टी कॉर्नरचा फायदा उचलत भारतासाठी चौथा गोल केला. भारताने सामना 4 - 2 असा जिंकला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने