पानसरे हत्याप्रकरणी सुनावणी २१ मार्चला

कोल्हापूर : संशयित आरोपी न्यायालयात हजर नसल्याने ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या सुनावणीत आज साक्षीपुरावे होऊ शकले नाहीत. जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग ३) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी २१ मार्चला ठेवण्यात आली आहे.दरम्यान, चारही साक्षीदार आज न्यायालयात हजर होते. मात्र, संशयित आरोपींपैकी काहींची सुनावणी ही कर्नाटकातील गौरी लंकेश खून खटल्यात होती. त्यामुळे ते हजर राहू शकत नसल्याचे संशयित आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे ही सुनावणी पुढील तारखेस निश्‍चित करण्यात आली. या वेळी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे उपस्थित होते.



ॲड. निंबाळकर यांनी समन्स बजावलेले चारही साक्षीदार आज न्यायालयात हजर असल्याचे सांगितले. साक्षीपुरावा सुरू करावा, अशीही विनंती न्यायालयाला केली. मात्र, ॲड. पटवर्धन यांनी आक्षेप घेत सर्व आरोपी न्यायालयात हजर असतानाच साक्षीपुरावे व्हावेत, अशी मागणी केली. तसेच, संशयित आरोपींपैकी काही जण आज गौरी लंकेश हत्या सुनावणीत असल्याचे सांगितले.तसेच, संशयित आरोपी अमित बदी आणि गणेश मिस्किन यांना मराठी येत नसल्याने कन्नड आणि मराठी येणारा दुभाषक आवश्यक असल्याची मागणी ॲड.पटवर्धन यांनी न्यायालयात केली. यावर ॲड. निंबाळकर यांनी सर्व आरोपींनी वकीलपत्रावर सह्या केल्या आहेत.वकील म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यामुळे ते उपस्थित पाहिजेतच किंवा त्यांना मराठी यायलाच पाहिजे, असे काही नसल्याचे सांगितले. पानसरे खटल्यातील संशयित आरोपी यांच्या इतर खटल्यातील सुनावणीच्या तारखांचा विचार करूनच येथील सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या वेळी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे न्यायालयात सुरक्षारक्षकासह उपस्थित होत्या.

‘व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक तयार करावी’

ॲड. पटवर्धन यांनी दुभाषक नेमावा, या दिलेल्या अर्जाला ॲड. निंबाळकर यांनी संमती दिली. त्यानंतर ॲड. एन. जी. कुलकर्णी यांची दोन्ही पक्षांच्या संमतीने नियुक्ती झाली. तसेच, व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक तयार करून सर्व संशयित आरोपींना या सुनावणीशी जोडले जाईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी ॲड. निंबाळकर आणि ॲड. राणे यांनी न्यायालयात केली. ॲड. पटवर्धन यांनी महत्त्वाच्या खटल्यात सर्वांना हजरच ठेवावे, अशी मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने