"आमचा पर्सनल अजेंडा..."; डोंबिवलीतील शोभायात्रेत CM शिंदेंनी दिल्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: राज्यभरात गुढी पाडव्याचा मोठा उत्साह सध्या दिसतो आहे. विविध शहरांमध्ये सकाळी शोभायात्रा निघाल्या. डोंबिवलीतही सकाळी पाडव्याची शोभायात्रा निघाली, यामध्ये पारंपारिक वेशभुषेत अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सरकारची इच्छा नेमकी काय आहे हे देखील सांगितलं.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "स्वागत यात्रेत आपण मोठा उत्साह पाहिला, आमचं सरकार आल्यापासून सर्व सण प्रचंड उत्साहात साजरे झाले. आता गुढी पाडवा देखील उत्साहात साजरा झाला. राज्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर आपली सांस्कृतीक भूकही असते त्यासाठी आपले सण उत्सव, परंपरा आपण जोपासली पाहिजे. यासाठी हे सण उत्सव आवश्यक आहेत. त्यामुळं तुमच्या सर्वसामान्यांच्या सरकारनं सर्व निर्बंध काढून टाकले"



या राज्यात गेल्या सात आठ महिन्यात आम्ही जे निर्णय घेतले ते पाहिले तर एवढे धाडसी निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. नुकताच आपला आर्थिक अर्थसंकल्प पार पडला. यामध्ये देखील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, तरुण, महिला यांचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला. लेक लाडकी ही सर्वात लोकप्रिय योजना आपण सुरु केली. एसटीत पन्नास टक्के सवलत देऊन टाकली. ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास दिला, कलाकारांसाठी निर्णय घेतले. कलाकारांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभं आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

डबल इंजिन सरकार वेगानं काम करतंय

या राज्याचा सर्वांगिण विकास करण्यामध्ये पंतप्रधान मोदींची आपल्याला साथ मिळते आहे. डबल इंजिन सरकार वेगानं काम करत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना सुखाचे दिवस आले पाहिजेत हाच आमचा प्रयत्न असणार आहे. यामध्ये आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने