'मोदी- शरद पवारांचे चांगले संबंध, त्यांनी NDA ला साथ द्यायला हवी'

 सांगली : ‘काँग्रेस आता खिळखिळी झाली आहे. त्यांचे नेते भाजपमध्ये येत आहेत. माझ्या पक्षाला नागालँडमध्ये मान्यता मिळाली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने साथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी आता ‘एनडीए’ला साथ द्यायला हवी’, असे भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषेदत मांडली.



आठवले जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कृष्णा नदी प्रदूषणाबाबत सांगलीकरांनी एकत्रित येत आवाज उठवला. कृष्णा नदीतील दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडले. नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. प्रदूषणमुक्तीसाठी राज्य सरकारने ठोस आराखडा तयार केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू.’’ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व समावेशक विकास होत आहे. पायाभूत सुविधांवर भर आहे. त्यामुळे जिल्ह्यातही महामार्गांचे जाळे पोहचले आहे. त्यामुळे बलशाली भारताची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रिपाई पक्ष विस्तारत आहे. नागालँडमध्ये दोन आमदार विजयी झाले. विविध राज्यात रिपाईच्या उमेदवारांना जनमत मिळत आहे. आता पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी खासदारकी लढण्याची तयार केली आहे. शिर्डी मतदारसंघातून मी इच्छुक असून याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलणे सुरू आहे.’’

कारवाईमागे भाजप नाही
आठवले म्हणाले, ‘‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करतात. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यांना वारंवार सूचित करूनही त्यांनी वक्तव्ये थांबवली नाहीत. त्यामुळेच त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली. त्यांचे लोकसभा सदस्यत्वही गेले. या कारवाईमागे भाजपचा कोणताही हात नाही. राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत.’’

ठाकरे बंधूंना सल्ला
आठवले यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला. ते म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांची नुकतीच सभा झाली. त्यांचे भाषण ऐकले जाते; मात्र जनता त्यांना मत देत नाहीत. त्यामुळे ठाकरे यांनी भोंग्यांपेक्षा पक्ष वाढवण्यावर भर द्यावा.’’ दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘शिंदेंनी उठाव केला. त्यांच्या मागे अख्खी शिवसेना राहिली. त्यामुळेच त्यांना पक्षाचे चिन्हही मिळाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नवा पक्ष काढावा.’’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने