नितीश कुमार हे तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत; अमित शाहांचं विधान

बिहार: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवादा येथून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर तुटून पडले. २०२४मध्ये बिहारच्या सर्वच्या सर्व ४० जागांवर कमळ फुलेल, असा विश्वास शाहांनी बोलून दाखवला.बिहारमधलं महायुतीचं सरकार आपल्या वजनानेच कोसळेल असं म्हणत अमित शाह यांनी २०२५ मध्ये बिहारमध्येही भाजपची सत्ता येईल, असं विधान केलं आहे.ते पुढे म्हणाले की, नितीश कुमार पंतप्रधान होणारच नाहीत. देशातल्या जनतेने नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्याचा निश्चय केला आहे. तसेच बिहारच्या जनतेने राज्यातल्या सर्व ४० लोकसभा जागांवर भाजप उमेदवार निवडून देण्याचं ठरवलं आहे. तेजस्वी यादव यांचं बिहारचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत.



लालू, नितीश यांच्यावर आसूड ओढत शाह पुढे म्हणाले की, ज्या सरकारमध्ये जंगलराजचे प्रणेते लालू यांचा पक्ष सहभागी आहे त्या बिहारमध्ये कधीही शांती प्रस्थापित होऊ शकणार नाही. लालूंच्या मुलाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. पंरतु मी त्यांना सांगू इच्छितो की, लालूजी तुम्ही नितीश बाबूंना ओळखता, त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पण तिथे जागा नाहीये.देशातल्या जनतेने याहीवेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केला आहे. जर मोदी पंतप्रधान झाले तर नितीश बाबू तुमच्या मुलाला मुख्यमंत्री बनू देणार नाहीत.ते पुढे म्हणाले की, नितीश कुमार हे सध्या गैरसमजात आहेत. परंतु बिहारची जनता गैरसमजात नाही. जनतेने ४० पैकी ४० जागा नरेंद्र मोदींना देण्याचं ठरवलं आहे. भाजपचे जेडीयूसाठी दरवाजे कायमस्वरुपी बंद असल्याचा पुनरुच्चार शाहांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने