समाजवादी पक्षापासून सावध राहा; मायावती यांचा मुस्लिम, दलित, ओबीसींना इशारा

लखनौ : दलित, ओबीसी तसेच मुस्लिम समाजाने समाजवादी पक्षापासून (सप) सावध राहावे असा इशारा बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी दिला. सप हा पक्ष विकास आणि जनतेच्या हिताऐवजी जातीच्या तसेच निरर्थक मुद्यांचे राजकारण खेळतो असा दावा त्यांनी केला.सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दोनच दिवसांपूर्वी बहुजन समाज आपल्या पक्षाच्या माध्यमातून एक होत असल्याचा दावा केला होता. आपले हक्क, लोकशाही तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचे रक्षण करण्यासाठी हा समाज मोठ्या प्रमाणावर सपच्या व्यासपीठावर येत असल्याचे ते म्हणाले होते.



या पार्श्वभूमीवर मायावती यांनी युतीपासूनच्या घडामोडींचा दाखल देत सपवर टीका केली. त्या म्हणाल्या की, बसपचे संस्थापक कांशीराम यांनी १९९३ मध्ये युती केली. त्यातून सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. बसपची बदनामी करणे आणि दलितांवर अत्याचार असाच त्यांचा डाव होता.मायावती यांनी एक ताजा संदर्भही दिला. सपचे नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी अलीकडेच पवादग्रस्त घोषवाक्य दिले. मिले मुलायम-कांशीराम, हवा हो गये जय श्रीराम असे ते घोषवाक्य होते, असे नमूद करून मायावती म्हणाल्या की, जातीच्या निकषावर द्वेषाचे राजकारण करणे हेच सपचे धोरण असते. अयोध्या, राम मंदिराशी संबंधित घोषवाक्य त्यावेळीही दिले जात होते. बसपची बदनामी करण्याचा हा खोडसाळ आणि पूर्वनियोजित कट होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने