साखर उत्पादनासह उताऱ्यातही घट सरासरी २० टक्के परिणाम, अवकाळीचा फटका

कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या साखर हंगामात ऊस गाळपाबरोबरच साखर उत्पादन आणि उताऱ्यातही मोठी घट झाली आहे. उसाची वाढ होत असतानाच सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस हंगामाच्या मुळावर बसला असून, कोल्हापूर विभाग वगळता इतरत्र गाळप व साखर उत्पादनात २० टक्के घट झाली. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही याचा दहा टक्के परिणाम झाला आहे.दरम्यान, राज्याचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात असून, यावर्षी हंगाम घेतलेल्या एकूण २१० कारखान्यांपैकी २०४ कारखान्यांची धुरांडी यापूर्वीच थंड झाली आहेत. कोल्हापूर, सांगलीतील हंगाम संपून महिना उलटला आहे. यावर्षी किमान १५ ते १७ लाख टन साखर किंवा उसाचा रस थेट इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्याने त्याचाही फटका बसला आहे.



गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे क्षेत्र वाढले होते, सप्टेंबरपर्यंत पिकांची वाढही जोमात होती. पण, सप्टेंबरमध्येच राज्यभर अवकाळी पावसाने थैमान घातले. सप्टेंबर हा ऊस वाढीसाठी पोषक वातावरण असलेला महिना, त्याच महिन्यात झालेल्या पावसाचा परिणाम उसाच्या वाढीवर झाला. ज्या भागात हेक्टरी १२० ते १२५ टन ऊस घेतला जात होता, तिथे हे प्रमाण ७० ते ७५ टक्क्यापर्यंत खाली आले.सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हा फटका ३० ते ४० टक्के बसला आहे. याच भागात गेल्या वर्षी काही कारखाने उशिरा सुरू झाले, त्यामुळे या वर्षीच्या हंगामात या कारखान्यांकडे खोडव्याचे प्रमाण ६० टक्के होते त्याचाही फटका हंगामाला बसला.

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाची फटका कमी बसला असला तरी ऊस उत्पादन दहा ते बारा टक्क्यांनी घटले आहे. मुळात या तीन जिल्ह्यांतील पिके जोमात असतात, तिथली जमीन सुपीक असते त्यामुळे मोठा पाऊस होऊनही नुकसान मात्र जास्त झाले नाही.साखर उत्पादनात जवळपास २० टक्क्यांनी घट झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत साखर दरावर होऊन दर वाढण्याची शक्यता जास्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने