एवढंच बाकी होतं, आता प्रकाशाचही वाढू लागलंय प्रदुषण..?

मुंबई: बुचकळ्यात पडला ना लेखाचे शीर्षक वाचून? आपल्या वाढत्या विजेच्या वापराने असे म्हणायची वेळ आली आहे. शहरात तर नक्कीच. रात्री आपण एखाद्या उंच ठिकाणी जाऊन शहराकडे खाली बघितले तर आपल्याला प्रकाशाचा इतका चकचकाट दिसतो की आकाशातले तारेसुद्धा दिसत नाहीत.‘प्रकाशाचे प्रदूषण’ याविषयी बाकी प्रदूषणाइतकी चर्चा होत नाही किंवा त्याकडे लक्ष दिले जात नाही. मात्र, आता जगभर शास्त्रज्ञांनी या विषयाकडे लक्ष वेधले आहे, कारण त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम जाणवायला लागले आहेत. प्रकाश प्रदूषण म्हणजे कृत्रिम प्रकाशाचे अतिक्रमण.



विद्युत उपकरणांद्वारे सोडल्या जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता आणि व्याप्ती, जेव्हा पर्यावरण व सजीवांच्या (प्राणी, पक्षी, वनस्पती) आरोग्याला घातक होते, तेव्हा त्याला प्रकाश प्रदूषण म्हटले जाते. जगातील ८३ टक्के लोक प्रकाशाच्या प्रदूषणात राहतात असा एक अंदाज आहे. ‘आकाशाचा चकचकाट’ (Sky Glow) हा २०१७मध्ये पृथ्वीच्या ४९ टक्के भूभागावर पसरल्याची नोंद झाली आहे.

प्रकाशाच्या प्रदूषणाचे मुख्य स्रोत

  • रात्रीचे चकचकीत व पांढराशुभ्र प्रकाश असलेले आणि बारा तासांपेक्षा जास्त लागलेले रस्त्यावरचे दिवे.

  • शहरातल्या व काही खेड्यातल्याही उत्पादनांच्या व दुकानांच्या जाहिराती करणार मोठे मोठे फलक.

  • उंच इमारतींना, विशेषतः हॉटेल्स यांना केलेली प्रकाशाची रोषणाई.

  • नदी, तलाव, आणि समुद्राकाठी असलेल्या हॉटेल व इतर व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केलेली विजेची रोषणाई.

  • रात्रभराची वाहतूक व वाहनांचे प्रखर प्रकाशाचे दिवे.

प्रकाशाचे प्रदूषण हे रात्रीच सर्वाधिक असते. अनिर्बंध वाढणारे शहरीकरण व चंगळवाद ही त्याची मुख्य कारणे आहेत. विकसितच्या तुलनेत विकसनशील राष्ट्रांमध्ये प्रकाशाचे प्रदूषण कमी आहे. ऐंशी टक्के अमेरिकी व साठ टक्के युरोपीय लोक आकाशगंगा बघू शकत नाहीत. चीन व भारतातील मोठ्या शहरांचे प्रकाशाचे प्रदूषण वाढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने