युरोपची लोकसंख्या शतकाअखेरीस घटणार; ‘युरोस्टॅट’चा अंदाज

ब्रुसेल्स:  युरोपची लोकसंख्या या शतकाच्या अखेरीपर्यंत सहा टक्क्यांनी घटेल, असा अंदाज ‘युरोस्टॅट’ या संस्थेने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, सध्याचे लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता एक जानेवारी २०२२ ते एक जानेवारी २१०० या कालावधीत युरोपची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा दोन कोटी ७३ लाखांनी कमी असेल.कोरोना संसर्गाचा परिणाम म्हणून २०२० आणि २०२१ या कालावधीत युरोपची लोकसंख्या घटली होती. मात्र, २०२२ पासून तिचा वाढीचा वेग पूर्वीप्रमाणे झाल्याचे दिसून आले आहे. युक्रेन युद्धामुळे प्रचंड संख्येने स्थलांतरीत लोक युरोपमध्ये आल्याने यावर्षी एक जानेवारीला या खंडाची लोकसंख्या ४५ कोटी १० लाख इतकी होती.



२०२६ मध्ये या लोकसंख्येत वाढ होऊन ती ४५ कोटी ३० लाखांपर्यंत जाईल. त्यानंतर मात्र लोकसंख्या वाढीचा आलेख खाली जात २१०० या वर्षापर्यंत युरोपची लोकसंख्या ४२ कोटी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. युरोपमध्ये सध्या बालके आणि किशोरवयीन मुलांचे एकूण लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाण २० टक्के आहे; ते शतकाअखेरीपर्यंत १८ टक्क्यांवर येणार आहे. त्याचप्रमाणे, काम करण्याच्या वयातील (२० ते ६४) लोकांची संख्याही नऊ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत मात्र दोन टक्क्यांनी वाढ होईल, असे ‘युरोस्टॅट’च्या अहवालात म्हटले आहे.

वृद्धांची संख्या वाढणार

युरोपमध्ये सध्याच्या लोकसंख्येच्या पिरॅमिडमध्येच दीर्घायुष्य असणाऱ्यांची संख्या अधिक असून कमी मृत्युदर आणि कमी जन्मदर आहे. २१०० या वर्षासाठीच्या लोकसंख्येच्या पिरॅमिडनुसार, लहान मुलांची संख्या कमी होणार असून ८५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांची संख्या मात्र वाढणार आहे. शतकाअखेरीस, शंभरच्या आसपास वय असणाऱ्यांचे प्रमाण वाढणार असून शंभरहून अधिक वय असणाऱ्या महिलांची संख्या सध्याच्या ०.०२ टक्क्यांच्या तुलनेत वाढून ०.३ टक्के होणार असल्याचा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने