उन्हाळ्याच्या सुट्टीत जीम लावायचा विचार करताय? 'या' १० गोष्टी अजिबात विसरू नका!

महाराष्ट्र : परीक्षा संपून शाळा कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे आता सुट्टीमध्ये काय करायचं असा प्रश्न ठरलेलाच. त्यात काही तरुण मुलामुलींचा ओढा जीमकडे दिसत आहे. १०वी - १२ वी झाल्यावर अनेक जण जीम लावण्याच्या विचारात असतील. अशाच तरुणांसाठी या काही टिप्स…
जीम लावण्याआधी सगळ्यात आधी तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या वयानुसार, गरजेनुसार कोणते व्यायाम करायला हवेत, ते घरी होतील की जीम गरजेचंच आहे, याची संपूर्ण माहिती घ्या. हौस म्हणून, किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून जीम लावायला जाऊ नका. तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर जर तुमचं जीम लावण्याचं ठरलं तर या काही टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील.




१. जीम विचारपूर्वक निवडा
जीम निवडताना तिथे खेळती हवा आहे का? व्यवस्थित प्रकाश आहे का हे नक्की पाहा. शिवाय अद्ययावत मशिनरी आहे का, ट्रेनर कसे आहेत याचीही माहिती घ्या. कोंदट किंवा अडचणीच्या जागेत व्यायाम करू नका. जीमचे ट्रेनर प्रशिक्षित आहेत ना, याचीही खात्री करून घ्या. तसेच या जीममध्ये कोणत्या प्रकारचे व्यायाम करून घेतले जातात, याचीही माहिती घ्या.

२. फ्री सेशन अवश्य घ्या
प्रत्येक जीममध्ये जॉईन करण्यापूर्वी फ्री सेशन असतात, ते अवश्य घ्या. यामुळे तुम्हाला जीममध्ये कोणते व्यायाम घेतले जातात, ट्रेनर कसे आहेत, जीम कसं आहे, याबद्दलची सगळी माहिती मिळेल.

३. तुमचं फीटनेस गोल ठरवा
तुम्हाला वजन कमी करायचं आहे की वाढवायचं आहे, तुम्हाला फिटनेस हवा आहे की सुडौल बांधा, शरीराचा एखादा भाग कमी करायचा आहे की पूर्ण फॅट कमी करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला किती दिवसांचा वेळ आवश्यक आहे, हे सगळं आधी ठरवून घ्या. एखाद्या कार्यक्रमासाठी वजन कमी अथवा वाढवायचं असेल, तर त्याप्रमाणे नियोजन करा आणि आपल्या ट्रेनरला याची पूर्वकल्पना द्या. त्यानुसार, तुमचे व्यायाम आणि आहार ठरेल.

४. आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष देऊ नका
आपल्याकडे कोण पाहत आहे, आपण चुकत तर नाही ना, अशा शंका कुशंका मनातून काढून टाका. तुमच्यकडे कोणीही पाहत नाही. आपल्याला व्यायाम करायचा आहे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष देऊ नका. त्याला माझ्यापेक्षा चांगलं जमत आहे, मला एखादा व्यायाम जमत नाही, असे विचार मनातून काढून टाका.

५. गर्दीच्या वेळा सोडून जीमला जा
गर्दीच्या वेळा सोडून जीमला गेल्याने तुम्हाला निवांत व्यायाम करता येईल. तसंच तुमच्या सुरुवातीच्या काळातल्या शंकाही तुम्हाला निर्धास्तपणे ट्रेनरला विचारता येतील. ट्रेनरचं व्यवस्थित लक्ष तुमच्याकडे राहील. गर्दीच्या वेळात बऱ्याचदा स्वतः व्यायाम करावा लागतो, तसंच मशीनच्या वापरावरही बंधनं येतात.

६. मदत मागायला लाजू नका
सुरुवातीला, जीमचा अंदाज येईपर्यंत, जीमचा व्यायाम शरीराला सूट होतोय का हे कळेपर्यंत ट्रेनरची किंवा सहकाऱ्यांची मदत घ्या. एखादा व्यायामप्रकार करता येत नसेल, तर न लाजता विचारा. पुनःपुन्हा विचारा पण चुकीचा व्यायाम करू नका.

७. तुमची प्रगती तपासत राहा.
तुम्ही तुमच्या गोलपासून किती लांब आहात हे वारंवार तपासत राहा.

८. मित्र किंवा नातेवाईकाला सोबत न्या.
कोणीतरी सोबत असेल, तर आपण आणखी उमेदीने व्यायाम करतो. किंवा सातत्य टिकून राहतं. त्यामुळे एखादा मित्र, नातेवाईक किंवा मैत्रिणीला सोबत न्या.0

९. आपल्या आवडीची गाणी ऐका
व्यायाम करताना किंवा चालताना चांगली गाणी ऐका त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यायामाचा फारसा थकवा जाणवणार नाही.

१०. एकदम जास्त व्यायाम करू नका
सुरुवातीलाच जास्त व्यायाम करू नका. थोडी थोडी सुरुवात करा. एक एक स्टेप पुढे जात जात व्यायाम वाढवा. एकाच दिवशी जास्त व्यायाम कराल, तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने