चक्रीवादळ उद्या जाखू बंदराला धडकणार; गुजरातच्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी (१५ जून) सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू शकते. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रती तास इतका राहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी परिसरात नुकसान होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अति तीव्र चक्रीवादळाचा वेग कमी झाल्यामुळे त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरातच्या जाखू बंदर परिसरात धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग प्रती तास १५० किलोमीटरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाखू बंदर, पोरबंदर, द्वारका, सौराष्ट्र, कच्छ, मांडवी परिसरात नुकसान होण्याची शक्यता आहे.



चक्रीवादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकते. राजकोट, मोरबी, जुनागड, कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर आणि पोरबंदर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. १५ जूनला किनारपट्टीवर १४५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. सोसाटय़ाचा वारा आणि पावसामुळे पिके, घरे, रस्ते, विजचे खांब कोसळू शकतात. वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्यावर सहा मीटर उंचीच्या लाटा धडकू शकतात. सखल भागातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. गीर राष्ट्रीय उद्यान, सोमनाथ मंदिरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची विशेष काळजी घेण्याची गरजही महापात्रा यांनी व्यक्त केली.

सर्वात जास्त काळ टिकलेले चक्रीवादळ

अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ सहा जूनला निर्माण झाले. चक्रीवादळाला आठ दिवस, नऊ तास झाले आहेत. १५ जूनला सायंकाळपर्यंत ते टिकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ते अरबी समुद्रातील आजवरचे सर्वात जास्त काळ टिकलेले चक्रीवादळ ठरणार आहे. या पूर्वी अरबी समुद्रात २०१९ मध्ये ‘क्यार’ हे तीव्र चक्रीवादळ तयार झाले होते. ते नऊ दिवस आणि पंधरा तास टिकले होते. २०१८मध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘गजा’ चक्रीवादळ नऊ दिवस, पंधरा तास टिकले होते. जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून चक्रीवादळांची संख्या वाढत आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

मोसमी वाऱ्यांची संथगती कायम

रत्नागिरीत रविवारी, अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केलेली नाही. अत्यंत संथ गतीने मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. कोकण किनारपट्टीवर केवळ सोसाटय़ाचा वारा वाहत आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा राज्यातील मोसमी पावसावर कोणताही परिणाम होणार नाही. पण सध्या मोसमी वाऱ्यांची वाटचाल संथगतीने सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी किनारपट्टीवर ढगांनी दाटी केली होती, पण पाऊस झाला नाही.


हवामान विभागाने बुधवारी कोकण-गोव्यात सोसाटय़ाचा वारा वाहून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींचा अंदाज आहे.


विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १८.३ तर अकोल्यात सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने