८१ व्या वर्षीही कमालीचे फिट अमिताभ बच्चन, तरूणांना लाजवणारी एनर्जी येते कशी

११ ऑक्टोबर, २०२३ रोजी बॉलीवूडचा शहनशाह आणि सर्वेसर्वा अमिताभ बच्चन यांचा ८१ वा वाढदिवस आहे. आजही अमिताभ बच्चन यांची एनर्जी ही तरूणांना हैराण करणारी आहे. अनेक तास काम करूनही अत्यंत उत्तम तब्बेत आणि एनर्जी नेहमीच अमिताभ बच्चन कसे सांभाळू शकतात याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

‘KBC’ च्या सेटवर आजही अमिताभ बच्चन सर्वाधिक उत्साहात दिसतात. बिग बी नेहमीच अत्यंत अनुशासित आणि उत्तम आयुष्य जगत आले आहेत आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात कशा पद्धतीने ते जगतात हे जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता असते. अमिताभ बच्चन यांचे फिटनेस रूटीन कसे आहे जाणून घेऊया.




जिम आणि नियमित चालणे

एका मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन रोज सकाळी लवकर उठतात आणि नियमित वर्कआऊट करतात. याशिवाय सकाळी न चुकता जिममध्ये जातात आणि २० मिनिट्स किमान चालण्याचा व्यायाम करतात. ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहावे यासाठी कधीही चुकवत नाही. यामुळेच दिवसभर एनर्जी उत्तम राहाते.

लवकर झोपण्याची सवय

एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी स्वतः स्पष्ट केल्यानुसार, ९ तास झोप पूर्ण केल्यानंतरच ते उठतात. तसंच रात्र लवकर झोपण्याची त्यांना सवय आहे. यामुळेच त्यांचे आरोग्य अधिक चांगले राखले जाते. तसंच आपल्या एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता की, नियमित प्राणायम आणि काही ब्रिदिंग एक्सरसाईज न चुकता ते करतात.

धुम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर

चित्रपटात अमिताभ बच्चन यांना धुम्रपान करताना दाखवलं असलं तरीही खऱ्या आयुष्यात मात्र धुम्रपानापासून ते दूर राहतात. याशिवाय कधीही अल्कोहोलचे सेवन करत नाहीत. इतकंच काय तर चहा अथवा कॉफीचेदेखील सेवन ते करत नाहीत. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी मदत मिळते आणि तरूणांनीही हे दैनंदिन पाळावे असं अमिताभ नेहमी सांगतात.

मिठाईचे सेवन नाही

फिटनेस राखण्यासाठी मिठाईपासूनही अमिताभ बच्चन दूर राहतात असे एका रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले आहे. केक, पेस्ट्री तसंच कोणत्याही भारतीय मिठाचे सेवन अमिताभ बच्चन यांनी बरेच वर्ष केलेले नाही. हे एखाद्याला खोटं वाटू शकतं, मात्र चांगल्या आरोग्यासाठी हा नियम त्यांनी कायम पाळला आहे.

कायम संतुलित आहार

अमिताभ बच्चन तरूणपणी मांसाहार करत होते, मात्र आता शुद्ध शाकाहारी झाले असून संतुलित डाएट रूटिनचा त्यांनी आधार घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या डाएटमध्ये नारळ पाणी, तुळशीची पाने, प्रोटीन ड्रिंक्स, आवळा, पनीर बुरजी, पालक, सूप, सलाड या सगळ्याचा समावेश करून घेतला आहे.

कसा आहे दिवसभराचा आहार

एका मुलाखतीत स्पष्ट केल्याप्रमाणे, नाश्त्यामध्ये दूध आणि पनीर बुरजी खाणे त्यांना आवडते. तर नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी नारळपाणी, आवळा ज्युस, बदाम हे उपयुक्त खाणे खायला आवडते. जेवणामध्ये चपाती, भाजी, आमटी आणि रात्रीचे जेवण अत्यंत हलके असल्याचेही त्यांनी सांगितले होते. डिनरमध्ये सुप्स अधिक प्रमाणात पिणे त्यांना आवडते, ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत मिळते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने