सरकारकडून केवळ ४० आमदारांचा विचार

कोल्हापूर : ‘पुढील लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक एकत्र होण्याची दाट शक्यता आहे. पण सध्या झालेल्या विविध निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाल्याने त्या लवकर होतील असे वाटत नाही. पण ज्यावेळी होतील, त्यावेळी भाजपला खूप मोठे नुकसान होईल,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच राज्यातील सरकार महाराष्ट्राचा नव्हे तर केवळ ४० आमदारांचा विचार करत असल्याने राज्याचा विकास रखडला असल्याचाही आरोप केला.महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या कार्यक्रमासाठी ते आज कोल्हापुरात आले होते. त्यावेळी आमदार पवार म्हणाले, ‘‘मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी एका मोठ्या पक्षाला फोडले, मोठा खर्च केला. हे सारे मुंबईचे महत्त्‍व कमी करण्यासाठी होते का हे भाजपने स्पष्ट करण्याची गरज आहे. शिंदे गटातील ४० आमदाराना मंत्री व्हायचे आहे.मग भाजपला काय मिळणार? वाद नको म्हणून ढकलायचे काम सुरू आहे. काहीही निर्णय होत नाहीत. डीपीसीचा निधी केवळ १७ ते १८ टक्के वापरला आहे. हजारो कोटींच्या कामांना स्थगिती आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी सारे सुरू आहे.पहाटेच्या शपथविधीबाबत खुद्द शरद पवार व अजित पवारच सांगू शकतील. ते सांगत नाहीत तोपर्यंत इतरांच्या मताचा प्रश्‍न नाही.’’ते पुढे म्हणाले, ‘‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना फक्त राजकारणच दिसते. शरद पवारांना त्यांनी उपमा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदीच मोठ्या नेत्यांबद्दल कसे बोलावे हे त्यांना शिकवतील.विधानपरिषदेत शिंदे गटाला एकही जागा न देणे हा प्रकार म्हणजे त्यांच्यावर विश्‍वास नाही किंवा त्यांचे महत्त्‍व भाजपला टप्प्याटप्‍याने कमी करायचे आहे. ठाकरे गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, इतर पक्षांनी भाजपला मदत होऊ नये असे काम करावे. त्यासाठी मोठे मन दाखवावे.’’

आजच्या आज राजीनामा लिहून द्यावा

‘राज्यपाल कोश्‍यारी यांनी राजीनाम्याबाबत टीव्हीवर वा ट्विट करण्याऐवजी कागद, पेन घ्यावा व आजच्या आज राजीनामा लिहून राष्ट्रपतींना द्यावा. त्या मोठ्या मनाच्या आहेत, त्या स्वीकारतील. तोंडी वक्तव्य करून चालणार नाही’, असा टोला आमदार पवार यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने