आचारसंहिता काटेकोरपणे पाळा!

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना कायदेशीर ‘प्रोग्राम कोड''चे (कार्यक्रम नियमावली किंवा आचारसंहिता) काटेकोर पालन करण्यास सांगितले. अपघात, अपघातातील जखमींचे रक्त,हल्ल्यांशी संबंधित सोशल मीडियावरुन घेतलेले चित्रीकरण आणि छायाचित्रे याचे प्रसारण संपादन केल्याशिवाय करू नयेत, असा इशारा देताना क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा मोटार अपघात आणि यापूर्वीच्या काही गुन्ह्यांच्या घटनांचे काही वाहिन्यांवरून झालेले वार्तांकन खराब व लज्जास्पद असल्याचेही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.मंत्रालयाने आज जारी केलेल्या नियमावलीत काही वृत्तवाहिन्यांच्या कामकाज पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आहेत. क्रिकेटपटूंच्या मोटार अपघाताचे कव्हरेज, मृतदेहांची वेदनादायक छायाचित्रे प्रसारित करणे आणि पाच वर्षांच्या मुलाची मारहाण या गोष्टींचा दिशानिर्देशिकेत उल्लेख केला आहे.या घटनांचे वृत्त व्हिडिओ फुटेजसह प्रसारित करणे आक्षेपार्ह असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अपघातातील मृतदेहांचे फोटो/व्हिडिओ बातम्यांत दाखवण्यात आले. यात आजूबाजूला रक्त सांडलेले दिसते. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे क्लोज-अप शॉट्समध्ये असल्याचे दाखवण्यात आले.अशा प्रकारचे वादग्रस्त व्हिडिओ संपादन न करता किंवा चेहरे अस्पष्ट न करताच कित्येक मिनिटांसाठी वारंवार दाखवले जातात, ज्यामुळे ते आणखी भयानक ठरते. काही घटनांबाबत संबंधित प्रसारणकर्त्यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ क्लिप आणि फोटो घेतले व ते जसेच्या तसे बातम्यांतदाखविले, हे अत्यंत गैर आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायद्यांतर्गत नियम बनविले आहेत त्यांच्या आधीन राहूनच गुन्हेगारी, अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे वृत्तांकन दाखविण्याचा सल्ला दिला आहे.

काही घटनांचे दाखले

३०.१२.२०२२: अपघातात जखमी झालेल्या एका क्रिकेटपटूच्या वेदनादायी छायाचित्राचे वाहिन्यांवरून प्रसारण. या घटनेचे व्हिडिओ फुटेज ‘ब्लर’ न करता दाखविले.२८.९.२०२२: एक व्यक्ती एका पीडित व्यक्तीचा मृतदेह ओढून नेत असतानाचे दृश्‍य दाखविले. हे फुटेज अस्वस्थ करणारे आहे. पीडिताच्या चेहऱ्यावरचे रक्ताचे डाग फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतात.६ जुलै २०२२: बिहारच्या पाटणा शहरातील एक दुर्दैवी घटना. एका शिक्षकाकडून पाच वर्षाच्या मुलाला निर्दयतेने मारहाण करताना दाखवले. मुलगा बेशुद्ध होईपर्यंत शिक्षक मारहाण करतो. हा व्हिडिओ आवाज बंद न करता दाखविला. यात लहान मुलाची किंकाळी ऐकू येते. हा व्हिडिओ नऊ मिनिटांपेक्षा अधिक काळ दाखविला गेला.४ जून २०२२: एका पंजाबी गायकाच्या मृतदेहाचे फोटो अस्पष्ट न करता प्रसारित केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने