आजपासून ‘छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी

कोल्हापूर: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून (ता. २०) सुरू होत आहे.राज्यातील बदललेली सत्ता, त्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथी, कारखान्याचे वाढलेले सभासद या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. १२ एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून त्याचदिवशी या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. सत्तारूढ गटाच्या काही उमदेवारांचे अर्ज उद्याच (ता. २०) मुहूर्ताने दाखल करण्यात येणार आहेत.‘राजाराम’च्या विद्यमान संचालकांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. पण कोरोनामुळे पहिली दोन वर्षे निवडणूक लांबली. त्यानंतर कारखाना सभासदांच्या यावरील हरकती, त्यावर घेतलेले आक्षेप आणि त्यातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला वाद यामुळे ही निवडणूक लांबली.९ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर दोन दिवसांतच राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला मात्र उद्यापासून सुरूवात होत आहे. सर्वसाधारण गटातील १५, महिला प्रतिनिधी गटातील दोन तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसुचित जाती व भटक्या विमुक्त गटातील प्रत्येक एक अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. संस्था गटाचे १२९ तर १३ हजार ४०९ अ वर्ग सभासद असे १३ हजार ५३८ सभासद मतदानासाठी पात्र आहेत.

निवडणूक कार्यक्रम असा

  • २० ते २७ मार्च उमेदवारी अर्ज भरणे

  • २८ मार्च अर्जांची छाननी

  • २९ मार्च ते १२ एप्रिल अर्ज माघारीची मुदत

  • १३ एप्रिल रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप

  • २३ एप्रिल मतदान

  • २५ एप्रिल मतमोजणी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने