PM मोदींच्या नावानं मतं मागितली तर भाजप नेत्यांना चप्पलेने मारा; श्रीराम सेना प्रमुखांचं वादग्रस्त विधान

दिल्ली:  श्रीराम सेनेचे  प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं मतं मागणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या  नेत्यांना चांगलंच फटकारलंय. मुतालिक यांनी कारवारमधील जनतेला घरोघरी प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यास भाजप नेत्यांना चप्पलांनी मारा, असं आवाहन केलंय.प्रमोद मुतालिक यांनी 23 जानेवारीला करकला येथून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक  लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुतालिक यांचा कर्नाटकात प्रचार सुरु असल्याचं बोललं जात आहे.इंडिया टुडेच्या वृत्तानुसार मुतालिक म्हणाले, "ते (भाजप) नालायक लोक आहेत. नालायक लोक नेहमी पीएम मोदींचं  नाव घेतात आणि त्यांच्या नावानं मतं मागतात. त्यांना कार्यकर्त्यांच्या समस्या समजणार नाहीत." दरम्यान, श्रीराम सेनेच्या प्रमुखांनी भाजप नेत्यांना मोदींचं नाव आणि फोटो न वापरता निवडणूक लढवून दाखवा, असं खुलं आव्हान केलंय.मुतालिक पुढं म्हणाले, मोदींचं नाव न घेता मतं मागा. पॅम्प्लेट आणि बॅनरवरचा मोदींचा फोटो हटवा आणि निवडणुकीला सामोरे या. तुम्ही काय विकास केला, किती गायी वाचवल्या, हिंदुत्वासाठी काय काम केलं? हे जनतेला सांगा. पण, नालायक लोक तसं करणार नाहीत. पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्याशिवाय त्यांना मत मिळणार नाहीत. ते पुन्हा तुमच्या दारात येतील. तुमचं मत मोदींना देण्यास सांगतील. जर त्यांनी मोदींचं नाव घेतलं तर त्यांना चप्पलांनी मारा, असं आवाहन त्यांनी केलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने