सारं जग आज करेल पण रोजचं साजरा कर... 'तू' तुझ्या स्त्रीशक्तीचा जागर...

मुंबई: जन्माला आल्यापासून प्रत्येकच दिवस आपला आहे फक्त आज अगदी ठरवून आपल्यासाठी मिळालेलं निमित्त म्हणून महिला दिनी व्यक्त होण्याची संधी निवडली.सार जग आज स्त्री शक्तीचा जागर करेल, स्त्रीचे माहात्म्य,थोरवी सांगेल, तिचा झगडा, तिची जिद्द अगदी सारकाही शब्दांकित केले जाईल. आणि त्याचा पुरेपूर आनंद, आदर देखील तू अनुभव. पण महिला दिन रोजच असतो आणि तो तुझ्या मनात तू नेहमी साजरा कर, तो कसा?एखाद्या सकाळी जेव्हा अंगात त्राण नसताना मनाचा हिय्या करून तू उठतेस, दुखण्याला न जुमानता साऱ्यांचे डबे, स्वयंपाक करतेस, पसरलेल्या घराची कंबर कसून घडी बसवतेस, घर नावाच्या ऑफिस मध्ये सुट्टी म्हणून कधी मागत नाहीस, तो दिवस कुणी साजरा केला नाही तरी तुझ्या कर्तृत्वाचा महिला दिनच असतो.

कधी घरात इवला जीव आजारी असताना जेव्हा मनावर दगड ठेवून तू नोकरीला निघतेस, मनात पिल्लाची काळजी पिंगा घालत असताना देखील तू तुझे काम चोख बजावून येतेस तो दिवस कुणी म्हणाले नाही तरी तुझ्यातील हिंमतीचा महिला दिन असतो. ज्यांच्या साठी स्वतःच कुटुंब, ओळख सोडून येतेस तेच कधी आमच - तुमच करून तुला वेगळे दाखवतात. मर्यादा ओलांडून कधी पाणउतारा करतात. तरीही सगळा राग गिळून जेव्हा तू त्याच "कुटुंबाला" पोटभर जेवू घालते, तो दिवस कुणी साजरा केला नाही तरी तुझ्यातील अन्नपूर्णेचा महिला दिन असतो.कमावणारा व्यक्ती घरात मुख्य असतोच पण त्याला आर्थिक हातभार लावताना जी काही तारेवरची कसरत तू करतेस आणि मोबदल्यात निव्वळ दुय्यम वागणूक पदरी पडते तरीही "माझा" संसार म्हणून पुन्हा उभारी आणतेस, तो दिवस तुझ्या मनातील मोठेपणाचा महिला दिन असतो.कधी व्यसनाधीन पतीचा व्याभिचार, उद्दामपणा, अन्याय झेलतेस पण स्वतः मधला स्वाभिमान, जिद्द जिवंत ठेवून नेटाने गाडी पुढे चालवतेस तो दिवस तुझ्यातील शक्तीचा महिला दिन असतो.स्वतःचीच बाळ मोठी करताना घरातूनच आईपणावर होणाऱ्या टीका झेलते आणि काही वर्षांनी त्याच थकल्या जीवांची आई बनून सेवा करते तो दिवस तुझ्यातील वात्सल्याचा महिला दिन असतो.कधी तू संसार न थाटता एकटीच ठामपणे जगतेस, समाजाच्या अनेक चौकटी मोडीत काढून समाजासाठीच काम करतेस, तो तुझ्यातील वेगळेपणाचा महिला दिन असतो.स्वतःच अस्तित्व विसरून मुलगी, आई, बायको, सून, काकू, मामी, आत्या असे अनेक पैलू स्वतःला पाडून घेतेस आणि नातीगोती नावाचा हिरा अखंड चमकवत ठेवतेस तो दिवस तुझ्यातील गोडव्याचा महिला दिन असतो. रोजच्या आयुष्यात शांतपणे शोधशील तर तुला तुझा महिला दिन रोजच दिसेल. तू सगळीकडे आहेस, कधी अवकाशात कधी सैन्यात कधी रिक्षात तर कधी स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांत कधी घरात कधी शाळेत...कधी दुडूदुडू धावणारी तर कधी सुरकुतल्या हातांची ऊब देणारी, तू जिथे जिथे आहेस तिथे कधी झगडा असेल कधी सुबत्ता असेल कधी विवंचना असतील तर कधी कौतुक असेल पण तुझ्यातल्या स्त्रित्वाला कायम साजर कर, प्रत्येक लढाई न हारता लढणारी "तू" स्त्री आहेस आणि म्हणूनच तुझ्या सोबतीत येणारीला पण स्त्री म्हणून समजून घे, उमलून दे व स्त्रित्वाची पणती अखंड तेवू दे!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने