"छत्रपतीचं नाव घेऊन मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसू नका"; संभाजीराजेंना महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीनं संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपतींचे वारस म्हणून तुम्ही आमच्यासोबत आहात असं आम्ही मानत होतो पण तुम्ही आमच्या या समजाला हारताळ फासला आहे, अशा कठोर शब्दांत समितीनं त्यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी हे पत्र लिहिलं आहे. मरगाळे यांनी पत्रात म्हटलंय की, "बेळगावातील राजहंसगड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला आपण हजेरी लावली, त्याबद्दल सीमावासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्षे मराठी माणूस निरंतर लाठ्याकाठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. यासाठी अनेकांनी जीवाचं बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला आहे. राजहंस गडावर शिवमूर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पाठीमागे व त्याच्या लोकार्पण सोहळ्यामागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळं महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपल्याला या कार्यक्रमाला हजेरी न लावण्याची विनंती केली होती. कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्याविरोधात मराठी माणसानं वेळोवेळी संघर्ष केला, प्रसंगी कारावासही भोगला. त्या संघर्षांचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमान हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती"पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करू नये

"छत्रपतींच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्यासोबत आहात असे आम्ही आजवर मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार देशमुख यांनी 'जय कर्नाटक' असे उद्वार काढले. आपण छत्रपतींचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमावासियांच्या आदरास अपात्र ठरत आहात. मराठी माणसाच्या लक्ष्याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही पण ज्या छत्रपतीचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लडतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती"

कोल्हापूरच्या जनतेसारखी भूमिका ठेवाल ही आशा

कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये, अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे. कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली, आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारस आहोत त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत, आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. तुम्ही आपच्या सोबत यावे ही श्री चरणी प्रार्थना, असं सविस्तर पत्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनं संभाजीराजेंना लिहिण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने