डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म का स्वीकारला?

मुंबई: डॉ. आंबेडकरांनी १९३५ साली येवला येथे हिंदुधर्मत्यागाची प्रतिज्ञा जाहीर केली व १९५६ मध्ये नागपूरला बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्मात प्रवेश केला, तो हिंदूंना अभिप्रेत असलेल्या बौद्ध धर्मापेक्षा जसा वेगळा होता, तसा बौद्धांना अभिप्रेत असलेल्या पारंपरिक बौद्ध धर्मापेक्षाही वेगळा होता.हा वेगळेपणा स्पष्ट करण्यासाठीच त्यांनी बौद्ध धर्माच्या संदर्भात 'धर्म' व 'धम्म' यात फरक केला व त्यातूनच आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्माला नवबौद्ध धम्म किंवा 'नवयान मानले. या नवबौद्धयानाच्या वेगळ्या स्वरुपाकडे आपले लक्ष वेधण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न प्रा. रावसाहेब कसब्यांनी आपल्या 'आंबेडकर व मार्क्स' या पुस्तकात केला आहे.आंबेडकरी नवबौद्धयानाचे वेगळेपण समजून घेताना व त्याचे विश्लेषण करताना आपल्याला काही प्रश्नांना व मुद्द्यांना सामोरे जावे लागते. अशा काही प्रश्नांकडे व मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

बौद्धदर्शनाची पुनर्रचना

एकूण बौद्ध वाङ्मयातील गुंतागुंत व परस्परविसंगती यातून बुद्धाचे मूळ विचार कसे हुडकून काढायचे किंवा निश्चित करायचे? या प्रश्नाला तोंड देताना आंबेडकरांनी तीन निकष ठरविले.

1. बुद्ध, हा बुद्धिवादी होता. बुद्धीला न पटणारे, तर्कदुष्ट विचार बुद्धाचे नसावेत. ते बुद्धाच्या नावावर घुसडले गेलेले असावेत.

2. लोककल्याणाशी जे प्रश्न संबंधित नाहीत; अशा प्रश्नांवर भाष्य करण्याचे बुद्धाने टाळले होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.

3. बुद्धाच्या विचारांचे दोन भाग पडतात. एकात बुद्धाचे निश्चित स्वरूपाचे विचार येतात, तर दुसऱ्यात बुद्धाने ज्याबाबत निश्चित भूमिका घेतली नाही असे विचार येतात. अशा अनिश्चित विचारांच्या संदर्भात नवी उत्तरे बुद्धाने मान्य केली असती.हे निकष म्हणजे वस्तुतः आंबेडकरांना बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची जी पुनर्रचना किंवा नवरचनाकरायची होती, त्या नवरचनेची तत्त्वे असावीत असे मानता येते. त्यांपैकी तिसऱ्या तत्त्वाने आंबेडकरांनीसूचित केले की, धर्म हा स्थितीशील असू नये, तर बदलत्या परिस्थितीबरोबर, वैज्ञानिक प्रगतीबरोबर तोबदलू शकेल अशी लवचिकता त्यात असली पाहिजे. बौद्ध तत्त्वज्ञानाचीही अशीच विज्ञानाभिमुख मांडणी त्यांनी केली.दुसऱ्या तत्त्वाच्या आधारे त्यांनी बौद्ध धर्माच्या उत्तरकालीन विशेषतः महायानसंप्रदायांशी वैचारिक जवळीक न करता, ती प्राचीन बौद्धदर्शनाशी केली; कारण महायान बौद्ध दर्शनात हे व्यावहारिक जग व त्याचबरोबर या व्यावहारिक जगात उद्भवणारी दुःखसमस्याच मिथ्या ठरविली गेली होती व या व्यावहारिक सत्यापलीकडील पारमार्थिक सत्याला; मग ते पारमार्थिक सत्य शून्य असेल किंवा विज्ञानवादी असेल; मध्यवर्ती स्थान दिले गेले होते.याउलट प्राचीन बौद्धदर्शनात माणसाची व्यावहारिक दुःखसमस्या मिथ्या न मानता, तिलाच मध्यवर्ती स्थान दिले गेले होते आणि या दुःखसमस्येशी साक्षात निगडित नसलेल्या परतत्त्वमीमांसेला मात्र निरुपयोगी म्हणून बाजूला ठेवले गेले होते.

साहजिकच मानवी कल्याणाचा मानवीकल्याण म्हणून विचार, या प्राचीन बौद्धदर्शनाच्या चौकटीतच सुलभ होतो; कारण माणसाचे 'माणूस' म्हणून व्यावहारिक पातळीवरील अस्तित्व अबाधित होते. माणसाचे खरे स्वरूप किंवा 'शून्य' मानलेले नव्हते. तेव्हा बौद्ध धर्मवाङ्मयातही प्राचीन (पाली) बौद्ध वाङ्मयाची त्या निवड, या दुसऱ्या निकषाच्या दृष्टिकोनातून योग्य होती असे म्हणावे लागेल.पण या प्राचीन (पाली) बौद्ध वाङ्मयातीलही बुद्धाच्या नावाने सांगितलेले सर्व विचार खरोखर बुद्धाचेच होते; असे म्हणण्यासारखी परिस्थिती नव्हती. इथे आंबेडकरांनी पहिल्या निकषाचा बुद्धिवादी निकषाचा वापर केला. बुद्धिनिष्ठ व तर्कशुद्ध विचारच बुद्धाचा असू शकेल असे मानले.पण हा बुद्धिवादी - निकषाचा प्रश्न जरा गुंतागुंतीचा आहे. कारण तत्त्वतः हे शक्य आहे की, बुद्धाला एखादा विचार तर्कशुद्ध वाटला असेल, पण आंबेडकरांना तो तसा वाटत नसेल. आंबेडकर; बुद्धमताचा विचार करता स्वतःला तर्कशुद्ध काय वाटते याचा विचार करणार व बुद्धाचा विचार तसाच असावा, असे ठरविणार.

दाहरणार्थ, बुद्धाला एकीकडे अनान्मवाद मान्य असूनही दुसरीकडे पुनर्जन्म (व्यक्तीचा पुनर्जन्म) मान्य होता, हे आंबेडकरांना तर्कदुष्ट व विसंगत वाटते. बुद्धालाही ते तसे वाटत असले पाहिजे का? की अनान्मवाद आणि (व्यक्तीचा) पुनर्जन्म यात विसंगती नाही, असे बुद्धाला वाटत असू शकेल; व त्याच्या त्या भूमिकेतही तथ्य असू शकेल ?बुद्ध अनात्मवाद मानत होता याचा एक अर्थ असा की, नाम (जाणीव, विज्ञान) व रूप (भौतिक शरीर) यांनी बनलेले, किंवा रूप वेदना-संज्ञा-संस्कार या पंचस्कंधांनी बनलेले माणसाचे व्यक्तित्व तो अनित्य मानत होता; त्यात काही तरी शाश्वत आत्मतत्व आहे हे नाकारत होता. पण हे व्यक्तित्व अनित्य मानूनही त्यात काही एक सातत्य आहे हे, तो नाकारत नव्हता.'संतान' या कल्पनेतून हे सातत्यच त्याने सूचित केले होते. एखाद्या यंत्राचा एकेक सुटा भाग बदलत गेल्यावर जसे ते यंत्र बदलत जाते; व एक वेळ अशी येते की, सुरुवातीचे यंत्र व शेवटचे यंत्र यांत समान काहीच नसते, त्याप्रमाणे माणसाचे व्यक्तिमत्त्वही बदलत जाते; पण त्याचबरोबर त्यात सातत्यही असते.

आंबेडकरांनी मिलिंद प्रश्नांतून, दिव्याने दिवा पेटण्याचे आणि लहानपणी शिकलेल्या गोष्टी मोठेपणी आठवण्याचे जे दृष्टान्त उद्धृत केले आहेत, त्यांतही (IV, II, IV) हा 'अनित्यता असूनही सातत्य' हाच मुद्दा स्पष्ट होतो. मानवी व्यक्तित्वाचे हे स्वरूप मान्य केले, तरी या परिवर्तमान संतानाच्या स्वरूपात मानवी व्यक्तित्व मरणानंतरही राहात असेल, त्याचा पुनर्जन्म होत असेल, ही तार्किक शक्यता नाकारली जात नाही. अशारीतीने व्यक्तीचा पुनर्जन्म मानण्यात तार्किक विसंवाद नाही, असे बुद्धाला वाटत असणे शक्य आहे.आंबेडकरांना मात्र यात मोठा विसंवाद वाटत होता व त्यामुळे व्यक्तीचा पुनर्जन्म ही कल्पना, बुद्धाच्या तत्त्वज्ञानात मुळात नसावी असे त्यांचे मत होते. याचा अर्थ असाही करता येईल की, बुद्ध तत्वज्ञानाचा मुळापेक्षा वेगळा अन्वयार्थ लावून आंबेडकरांनी बुद्धतत्त्वज्ञानात काही परिवर्तनेच सुचविली. भारतीय दर्शन- शास्त्रांच्या विकासात आपल्याला जी एक सर्रास रूढ झालेली पद्धत सर्वत्र दिसते, तीच पद्धत आंबेडकरांनीही वापरली.

भारतीय दर्शनांचा जो विकास, त्या त्या दर्शनातील भाष्यकारांनी किंवा स्वतंत्र ग्रंथकारांनीही केलेला दिसतो, तो बहुधा पूर्वसूरींची मते खोडून न काढता, स्वतःला योग्य वाटणारे विचार पूर्वसूरींना अभिप्रेत होतेच, असे दाखवून केलेला दिसतो आणि ही पद्धत सर्वच संप्रदायांच्या आचार्यांनी सरसकट वापरली होती, त्याला आंबेडकरही अपवाद ठरले नाहीत इतकेच! तेव्हा या प्रश्नाचा विचार केवळ आंबेडकरांनी बुद्ध तत्त्वज्ञानाच्या मूळ स्वरुपात फेरफार केले की नाही, एवढ्यापुरता करून चालणार नाही.समजा, मूळ बौद्ध तत्त्वज्ञानात त्यांनी काही फेरफार केले असतील, तरी ते काय काय केले, आणि या फेरफारांतून त्यांनी काय साध्य करायचा प्रयत्न केला; हा प्रश्न उरतोच आणि तोच प्रश्न अधिक महत्वाचा उरतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने