दिल्ली: सुदानमधून परतलेल्या भारतीय नागरिकांनी आपला भयानक अनुभव शेअर केलाय. अनेक दशकं ते तिथं राहत होते, तर काहींचा जन्म तिथंच झाला होता.भारतात परतल्यावर एकीकडं जीव वाचल्याचा आनंद, तर दुसरीकडं घर सोडल्याचं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आतापर्यंत सुमारे 1100 भारतीयांना सुदानमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. बुधवारी जेद्दाह, सौदी येथून विशेष विमानानं 367 भारतीयांना दिल्लीत आणण्यात आलं. दुसरीकडं, 246 अन्य भारतीय गुरुवारी मुंबईत पोहोचणार आहेत.डॉ. रुपेश गांधी यांचा जन्म आणि पालनपोषण सुदानमध्ये झालं. बुधवारी रात्री दिल्ली विमानतळावर उतरल्यावर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या सुदानमध्ये अडकलेल्या 367 भारतीयांपैकी ते एक आहेत, ज्यांची सरकारनं ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुटका केली. त्यांची पत्नी रिना हिच्यासोबत विमानतळावरून बाहेर पडताना रुपेश यांच्या वेदना दिसत होत्या. त्यांनी सांगितलं, 'तिथं प्रचंड गोळीबार सुरू आहे. माझे सहकारी मारले गेले आहेत. मी कधीच सुदानला जाणार नाही.'
रिना म्हणाली, सुदानमध्ये गेले काही दिवस आम्ही दु:ख भोगत आहोत. वीज आणि पाण्याविना नागरिक त्रस्त आहेत. जगण्यासाठी धडपडत आहेत. सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथून विशेष विमानानं दिल्लीत आणलेल्या 367 प्रवाशांमध्ये हे जोडपं होतं. सुदानमधून ते जेद्दाहला पोहोचलं होतं. सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि मुख्य निमलष्करी दलांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे.बुधवारी रात्री ९.११ वाजता विशेष विमान दिल्लीत उतरलं, तेव्हा अनेक प्रवासी आनंदानं ‘जय श्री राम’ असा जयघोष करत बाहेर आले. आपली पत्नी आणि दोन मुलांसह परतलेले सिद्धार्थ राय (37) म्हणाले, मी आपला जीव धोक्यात घालून पोर्ट सुदानला जाण्यासाठी बसमधून खार्तूमपासून 900 किलोमीटरचा प्रवास केला. रहिवासी भागांवर बॉम्बस्फोट आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाल्यानंतर आम्ही हा धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. आम्ही कशीतरी बसची व्यवस्था केली, जी 50 भारतीयांना घेऊन सुदानला गेली. आम्ही भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात होतो. भयंकर संघर्षात प्रवास करणं आव्हानात्मक असलं, तरी आम्ही ती जोखीम पत्करली याचा आम्हाला आनंद आहे.
महेंद्र यादव हा सुदानमधील एका कारखान्यात काम करायचा. “जेव्हा हिंसाचार सुरू झाला, तेव्हा सर्व दुकानं बंद होती आणि लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं. काही स्थानिक लोकांनीही लुटमार सुरू केली. त्यांनी माझा मोबाईलही हिसकावून घेतला. माझ्याकडील सर्व पैसेही काढून घेण्यात आले.मुरारी श्रॉफ हे सुदानमधील एका मोबाईल कंपनीत महाव्यवस्थापक होते. गेल्या काही दिवसांपासून तेथील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रॉफ म्हणाले, “लोक अनेक महिन्यांपासून विरोध करत आहेत, पण गेल्या पंधरवड्यात परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्ही सुखरूप भारतात परतलो.”उद्योगपती तरसेम सिंग सैनी आणि त्यांची पत्नी दिविंदर 1994 पासून खार्तूममध्ये राहत होते. ते आपला पाळीव कुत्रा ब्राउनी आणू शकले नाहीत याचं त्यांना खूप दुःख झालंय. दिविंदर यांनी सांगितलं, 'ब्राउनी आम्हाला आमच्या मुलासारखा होता. गेली 12 वर्षे तो आमच्यासोबत आहे. आम्ही त्याला एका कुटुंबाच्या ताब्यात दिलं आहे. तो कसा असेल याची मला काळजी वाटते.'