युद्धनौका, लढाऊ विमाने आदींच्या सरावाने चीनकडून तैवानची कोंडी

बीजिंग:  तैवानच्या सीमेवर चीनच्या युद्धसरावाचा सोमवारी तिसरा दिवस होता. युद्धनौका, लढाऊ विमाने आदींच्या सरावाने चीनचे तैवानची कोंडी केली आहे. दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातील ज्या भागावर चीन दावा करतो, तेथे अमेरिकेच्या नौदलाने क्षेपणास्त्रभेदी विनाशिका सज्ज ठेवल्या आहेत.

चीनच्या लढाऊ विमानांनी सोमवारी तैवानवर हल्ल्यांचा सराव केला. यात त्यांचे शांडोग लढाऊ विमानाचा सहभाग होता. तैवानच्या अध्यक्षा साई इंग-वेन यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाचे प्रवक्ते केव्हिन मॅकर्थी यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीच्या प्रत्युत्तर म्हणून चीनने हा सराव शनिवार (ता.८) पासून सुरु केला आहे. तैवानला लक्ष्य करीत हल्ले करणे आणि वेढा घालणे यांचा समावेश होता. या सरावात तैवानची कशी कोंडी करावी, याचाही अभ्यास करण्यात आला, असे चीनच्या सैन्यदलाने म्हटले आहे. आजच्या सरावामध्ये चीनच्‍या दोन विमानवाहू नौकांपैकी एक सहभागी झाली होती.चीनने संयम ठेवावा, असे वारंवार आवाहन करणाऱ्या अमेरिकेने दक्षिण चीनी समुद्रात ‘यूएसएस मिलीअस’ ही क्षेपणास्त्रभेदी विनाशिका तैनात केली आहे. जलवाहतुकीच्या स्वातंत्र्याने समुद्राच्या कायदेशीर वापराचा अधिकार आणि स्वातंत्र्य मिळते. असे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहेत. स्पार्टली द्विपसमूहाजवळून विनाशिका गेल्याचेही त्यांनी सांगितले. या द्विपकल्पावर चीन, तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेई यां देशांनी दावा सांगितलेला आहे. तैवानपासून बेट तेराशे किलोमीटर दूर आहे. अमेरिकेने आज दक्षिण चिनी समुद्रात ‘मिलीअस’ तैनात केल्याने चीनच्या संतापात भर पडली आहे. अमेरिकेच्या जहाजाने त्यांच्या हद्दीतील पाण्यात बेकायदा घुसखोर केल्याचा आरोप, चीनने केला आहे.

आजच्या सरावात

  • चीनच्या फुजियान प्रांतातील खडकाळ किनाऱ्यावर चीनने प्रत्यक्ष हल्ल्याचा सराव केला

  • फुजियान प्रांत चीनपासून १९० किलोमीटर अंतरावर आहे

  • स्थानिक सागरी प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात ते रात्री आठपर्यंत पिंगटन येथे युद्ध सराव झाला.

  • पिंगटन हे तैवानच्या सीमेलगतचे चीनमधील एक बेट आहे

तैवान सज्ज

चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ सैन्यदलाच्या ईस्टर्न थिएटर कमांडने सरावाबाबत निवेदन प्रसिद्ध केले असून ‘एच-६के’ या विमानाने अनेक तोफगोळ्यांचा वर्षाव केला. ‘‘चीनची ७० लढाऊ विमाने आणि ११ युद्धनौकांचा माग काढला आहे. अशा प्रकारच्या हालचालींना जशास तसे उत्तर देण्यास युद्धनौका, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र तयार आहेत,’’ असे तैवानने म्हटले आहे.

जपानही सावध

चीनचा युद्धसराव आणि अमेरिकेने तैनात केलेली विनाशिका या सर्व घटनांवर लक्ष ठेवून असल्याचे जपानने म्हटले आहे. जपानपासून २३० किलोमीटर अंतरावर चीनच्या अनेक युद्धनौका तैनात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने