प्रश्‍न मांडण्यापासून रोखू शकत नाहीत; राहुल गांधी

नवी दिल्ली : खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रथमच आपल्या जुन्या मतदारसंघात आलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘ते माझे घर हिसकावून घेऊ शकतात, मला तुरुंगात टाकू शकतात, पण वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधीत्व करण्यापासून आणि त्यांचे प्रश्‍न मांडण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही,’ असे राहुल यांनी आज एका सभेत सांगितले.राहुल गांधी यांनी त्यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह केरळमधील वायनाडचा दौरा केला. याच मतदारसंघातून राहुल गांधी लोकसभेवर निवडून गेले होते. एका खटल्यात दोषी ठरत दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी रद्द केली आहे.या घटनेनंतर राहुल हे आज प्रथमच वायनाड येथे आले. त्यांनी प्रियांका यांच्यासह ‘सत्यमेव जयते’ या नावाने कलपेट्टा गावात रोड शो केला. यावेळी भाजपवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले,‘‘माझ्या नावामागील फक्त खासदार हा शब्द काढून घेण्यात आला आहे. मात्र, लोकप्रतिनिधी असणे हे त्याहून अधिक आहे.संसदेचा सदस्य हा केवळ शिक्का किंवा पद आहे. भाजप हा शिक्का, पद, घर हिसकावून घेऊ शकतात, मला तुरुंगातही टाकू शकतात; पण वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधीत्व करण्यापासून मला ते रोखू शकत नाहीत.इतक्या वर्षांनंतरही भाजपला त्यांच्या विरोधकांना समजून घेता आले नाही, याचे मला आश्‍चर्य वाटते. माझ्या घरी पोलिस पाठविल्याने मी घाबरून जाईल असे त्यांना वाटले. मी अनेक वर्षांपासून भाजपविरोधात लढत आहे. त्यांना माझा लढा अद्याप समजलेलाच नाही. पोलिसांचा धाक दाखवून ते आम्हाला घाबरवू शकत नाहीत.’’

राहुल म्हणाले...

- मी आता खासदार नाही, त्यामुळे ते माझे घर घेऊ शकतात

- वायनाडमध्ये आलेल्या पुरात अनेकांचे घर गेलेले मी पाहिले आहे

- केरळने मला मुलासमान मानले

- लोकप्रतिनिधीला जनतेच्या भावना, दु:ख समजायला हवे

राहुल यांनी केवळ प्रश्‍न विचारले आणि त्या प्रश्‍नांना उत्तर देता येत नाही म्हणून त्यांची प्रतिमा मलिन करणे आणि निर्दयी हल्ला करणे हे संपूर्ण सरकार, प्रत्येक मंत्री, खासदार आणि स्वत: पंतप्रधानांनाही योग्य वाटते, हे धक्कादायक आहे. राहुल हे धीरोदात्त आहेत, कोणत्याही दबावापुढे ते झुकणारे नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने