चार वाजता बिपरजॉय धडकणार गुजरातच्या किनाऱ्याला; मुंबईवर काय होणार परिणाम?

सर्वाधिक काळ टिकलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चारनंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकणार आहे. अरबी समुद्रात नैऋत्येकडे घोंघावत निघालेल्या या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुजरातमध्ये ७४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

राज्य सरकारने गुजरातच्या आठ किनारी जिल्ह्यांमधून ७४ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. यामध्ये कच्छ जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील ३५ हजार ८२२ लोकांचा समावेश आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे आजूबाजूच्या २४० गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कच्छ आणि देवभूमी द्वारकाच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी पाऊस झाला आहे. या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. हे दोन्ही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे आयएमडीने जाहीर केले आहे.मुंबईसह, ठाणे, पालघर येथे वादळी वाऱ्यांची शक्यता

मागील दोन दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई येथे जोरदार वारे वाहत होते. तसेच मंगळवारी नवी मुंबई व ठाणे परिसरात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र हा पूर्वमोसमी पाऊस असून तसेच बिपरजॉयचा मिश्र परिणाम असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवण्याची शक्यता असल्याने येथीलही एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात आहेत. यापैकी पाच तुकड्या मुंबईत असतील. प्रत्येक तुकडीत ३५ ते ४० जवान असून त्यांच्याकडे वादळानंतरच्या नुकसानीत बचावकार्य करण्याची सर्व साधने असणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गेटवे ऑफ इंडियावर समुद्राच्या उंचच उंच लाटा उसळत आहेत. मुंबईत सकाळी उच्च भरतीच शक्यता वर्तवण्यात आली होती.

समुद्रकिनारी जाऊ नका

बिपरजॉय चक्रीवादळामुळे ईशान्य अरबी समुद्रात आज समुद्र खवळणार आहे. यामुळे मासेमारी करण्यास जाऊ नये, समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन, IMDचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी केले आहे. “बिपरजॉय हे अतिशय तीव्र चक्रीवादळ आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कच्छमध्ये २-३ मीटर उंच लाटा अपेक्षित असून पोरबंदर आणि द्वारका जिल्ह्यांमध्ये वाऱ्याच्या वेगासह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे”, अशी माहिती आयएमडीचे महासंचालक डॉ.मृत्यूंजर महापात्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कक्ष सज्ज झाला आहे. तसंच, चार जहाजेही तैनात करण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने एका निवेदनात दिली आहे. पोरबंदर आणि ओखा येथे प्रत्येकी पाच मदत पथके आणि वालसुरा येथे १५ मदत पथके नागरिकांच्या मदतीसाठी तैनात आहेत.

गर्भवती महिलांनीही केले सुरक्षित

“कच्छ जिल्ह्यातील ४७००० हून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. सर्व गर्भवती महिलांना रुग्णालये आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आमचे उद्दिष्ट शून्य जीवितहानी सुनिश्चित करणे आहे. मी लोकांना त्यांच्या संबंधित ठिकाणी सुरक्षित राहण्याचे आणि प्रवास टाळण्याचे आवाहन करतो”, असं गुजरातचे आरोग्य मंत्री रुषिकेश पटेल म्हणाले. दरम्यान, मांडवी समुद्रावर उंचच उंच लाटा उसळत आहेत. सायंकाळी या ठिकाणी भूंकप होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने