अमेरिका, रशिया, जपानसारख्या देशांचा संपूर्ण जगावर प्रभाव आहे. यातल्या काही देशांमधील नागरिकांना त्या-त्या देशांच्या पासपोर्टवर जगभरातल्या अनेक देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येतं. जपान हा देश या बाबतीत अव्वल स्थानावर होता. परंतु तो मान आता सिंगापूरने पटकावला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्व देशांत शक्तिशाली ठरला आहे. कारण सिंगापूरच्या पासपोर्टवर नागरिकांना जगभरातल्या १९२ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येतं.
व्हिसा-मुक्त राष्ट्रांच्या ताज्या क्रमवारीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून अव्वल स्थानावर असलेला जपान तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. जपानी पासपोर्टवर नागरिक १८९ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात. जर्मनी, इटली आणि स्पेन हे देश या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर जपानबरोबर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रिया, फिनलॅन्ड, फ्रान्स, लक्झम्बर्ग, दक्षिण कोरिया आणि स्वीडन ही राष्ट्रं आहेत.
दरम्यान, भारताने गेल्या वर्षीपेक्षा ५ स्थानांनी आपली स्थिती सुधारली आहे. भारत आता व्हिसामुक्त राष्ट्रांच्या यादीत ८० व्या क्रमांकावर आहे. भारतीय पासपोर्टवर नागरिक ५७ देशांमध्ये फिरू शकतात. ८० व्या क्रमांकावर भारतासह टोगो आणि सेनेगल ही राष्ट्रेही आहेत.
दशकभरापूर्वी या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेची घसरण सुरूच आहे. अमेरिका दोन स्थानांनी घसरून आठव्या स्थानावर आली आहे. तर युनायटेड किंगडमने दोन स्थानांची झेप घेत पाचवा क्रमांक पटकावला आहे.
या यादीत अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या (१०३ व्या) क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानच्या पासपोर्टवर नागरिक २७ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात. या यादीत येमेन ९९ व्या, पाकिस्तान १०० व्या, सीरिया १०१ व्या आणि इराक १०२ व्या क्रमांकावर आहे.