दिवसाला सहा ते आठ ग्लास पाणी पिण्याने वाढू शकते तुमचे आयुष्य! वयानुसार किती पाणी प्यावे? वाचा काय सांगतात डॉक्टर

पाण्याला जीवन म्हटलं गेलंय. जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ‘यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ (NIH) मधील संशोधकांच्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, तुम्ही किती पाणी पिता यावरून तुम्ही किती वर्षे जगू शकता हे कळू शकते. मध्यमवयीन लोक ज्यांच्या रक्तात सीरम सोडियमची पातळी जास्त असते आणि त्यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका जास्त असतो. आपण जेव्हा कमी पाणी पितो तेव्हा सीरम सोडियमची पातळी वाढते. पाणी प्यायल्यामुळे आपल्याला कमी भूक लागते, जे आपल्याला वजन कमी करण्यास मदत करते. सकाळी उठल्या उठल्या ताबडतोब पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यास मदत होते. दुरुस्तीची ही प्रक्रिया होताच आपल्या पाचन तंत्रामध्ये सुधारणा होते.
पाणी पिल्याने खरंच आयुष्य वाढत का ?

डॉ. नतालिया आय दिमित्रीवा यांच्या मते, योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमच्या आयुष्यात वाढ होतो. तर डॉ धीरज भट्टड, यांच्या मते, पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मनुष्य म्हणून आपण आपले जीवन अम्निओटिक द्रवपदार्थाने सुरू करतो; ज्यात ९९ टक्के पाणी असते आणि प्रौढ व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे ६० टक्के असते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीराचे कार्य, विशेषत: मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि विषारी पदार्थ साफ टाकण्यासही मदत होते.

दिवसातून किती पाणी प्यावे?

एखाद्या व्यक्तीने खरोखर किती पाणी प्यावे? याबाबत आधुनिक वैद्यकशास्त्रही कोणतेही निश्चित उत्तर देत नाही. काही डॉक्टर सहा ते आठ ग्लास पाणी किंवा अंदाजे दोन लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात. जे लोक जास्त शारीरिक काम करतात किंवा तीव्र क्रीडा क्रियाकलाप करतात, गरम वातावरणात असतात किंवा जास्त प्रथिने किंवा मिठाचे सेवन करतात त्यांनी जास्त पाणी प्यावे. याउलट हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या रुग्णांने पाण्याचे मर्यादित सेवन करावे. अनावश्यक जास्त पाणी पिण्यामुळे हायपोनेट्रेमियाचा धोका होऊ शकतो. डॉ. भट्टड सांगतात की, तुमच्या लघवीचा रंग हा तुमच्या पाण्याचे प्रमाण ठरवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या लघवीचा रंग जितका गडद असेल तितके जास्त पाणी प्यावे लागेल. डिहायड्रेशनच्या इतर लक्षणांमध्ये कोरडे तोंड, थकवा, डोकेदुखी व चक्कर येणे यांचा समावेश होतो. जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्ही पाणी प्यावे.

एका लोकसंख्येच्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की, सुमारे ५० टक्के लोक शिफारस केलेल्या प्रमाणात पाणी पित नाहीत; ज्यात मुलांचाही समावेश आहे. “म्हणून सर्व वयोगटांसाठी पुरेसं हायड्रेशन महत्त्वाचं आहे; जे तुम्हाला निरोगी आणि दीर्घकाळ जगण्यास मदत करतं. यासोबतच तुम्हाला निरोगी पौष्टिक अन्न, व्यायाम आणि आरोग्याची चांगली काळजी घेणं गरजेचं आहे. केवळ हायड्रेशन पुरेसं नाही,” असंही डॉक्टर सांगतात. तसेच हायपोहायड्रेशनमुळे आजार होण्याचा आणि लहान वयात मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

वयानुसार किती पाणी प्यावे ?

‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’नुसार तरुण, प्रौढ व मध्यमवयीन लोकांमध्ये पाण्याचे सरासरी प्रमाण वयानुसार बदलते. २०-३९ वयोगटासाठी दररोज चार ते सहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. तर, ४०-४९ वयोगटातील लोकांनी दररोज सहा ते सात ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जास्त वजन असलेल्या काही व्यक्तींना अधिक पाण्याची आवश्यकता असू शकते. डॉ दिमित्रीवा सांगतात, “चहा आणि कॉफी काही प्रमाणात हायड्रेशन भरून काढू शकतात. तसेच आपल्या आहारात टरबूज, काकडी व स्ट्रॉबेरी यांचा समावेश केला पाहिजे.

आम्ही तुम्हाला काही कारणे सांगणार आहोत की झोपेतून उठल्यावर ताबडतोब पाणी पिण्यामुळे तुमचे जीवन कसे सुधारु शकते.

पाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ द्रुतगतीने बाहेर पडतील. त्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि कोमलता मिळेल; ज्यासाठी तुम्ही बाजारातून अनेक प्रकारची केमिकलयुक्त कॉस्मेटिक उत्पादने खरेदी करता.

५०० मिली पाण्याचे सेवन केल्याने रक्तप्रवाह वाढतो. तसेच नवीन रक्तपेशींचे निर्मितीही वाढते. आपल्या शरीरात पाण्याच्या अभावामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणि रोम छिद्रे खोल होऊ शकतात. पाण्यामुळे आपल्या पोटातील पित्त किंवा आम्लता कमी होते. जेव्हा आपण सकाळी लवकर पाणी पितो तेव्हा आपल्याला ॲसिडिटी आणि गॅसपासून मुक्ती मिळते आणि पोट हलके राहते.

पाण्यामुळे किडनीतील स्टोनचा धोका कमी होतो. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील; ज्यामुळे मूत्राशयाच्या संक्रमणास प्रतिबंध होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने