भारतीय बुद्धिबळपटूंचे विश्वचषक स्पर्धेतील यश ऐतिहासिक -आनंद

मुंबई : विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत एका देशाच्या एका खेळाडूनेही उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठणे हे मोठे यश असते. आपल्या तब्बल चार खेळाडूंनी हा टप्पा गाठला आहे. भारतीय बुद्धिबळपटूंचे हे यश ऐतिहासिक आहे, असे गौरवोद्गार पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने काढले.

भारतातील बुद्धिबळ आणि बुद्धिबळपटूंनी गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने प्रगती केली आहे. भारतीय बुद्धिबळपटूंनी आपली अलौकिक कामगिरी सध्या बाकू येथे सुरू असलेल्या विश्वचषकातही कायम राखली आहे. भारताच्या डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी आणि अर्जुन एरिगेसी या चार ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंना उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यात यश आले आहे.



‘‘भारतीय बुद्धिबळपटूंचे विश्वचषकातील यश ऐतिहासिक आहे. या स्पर्धेत आव्हान शाबूत असलेल्या आठ बुद्धिबळपटूंपैकी चार भारतीय आहेत. हा भारतासाठी विक्रमच म्हणावा लागेल. आता या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आपल्या एक किंवा दोन बुद्धिबळपटूंना ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतून जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जगज्जेत्याला आव्हान देणारा खेळाडू निश्चित केला जाईल. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेची भारतीय बुद्धिबळप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतील,’’ असे आनंदने सांगितले.

विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन बुद्धिबळपटू पुढील वर्षी कॅनडा येथे होणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंद आणि एरिगेसी आमनेसामने आल्याने यापैकी एक स्पर्धेत आगेकूच करणार हे निश्चित आहे. उपांत्य फेरीतही त्यांनी विजय मिळवल्यास त्यांचे ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील स्थान पक्के होईल.

गुकेशची कामगिरी कौतुकास्पद

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर डी. गुकेशने विश्वनाथन आनंदला मागे टाकून ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये (क्रमवारी) भारताचा अव्वल बुद्धिबळपटू बनण्याचा मान मिळवला आहे. १ सप्टेंबर रोजी यावर शिक्कामोर्तब होईल. विशेष म्हणजे, गुकेश हा आनंदच्याच अकादमीचा विद्यार्थी आहे. या यशाबद्दल गुकेशचे आनंदने कौतुक केले. ‘‘गुकेशचे यश खूपच खास आहे. मी आता फारशा स्पर्धा खेळत नाही. त्यामुळे मी जवळपास निवृत्तच झालो आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र, क्रमवारीतील माझे गुण हे त्याच्यासमोरील लक्ष्य होते आणि ते त्याने केवळ गाठले नाही, तर तो बराच पुढे गेला. मला मागे टाकण्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्याने अव्वल दहा बुद्धिबळपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. तो सातव्या स्थानावर आला आहे आणि त्याची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे,’’ असे आनंद म्हणाला.

आनंदचा मोठेपणा!

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आनंदने एकाच वेळी २२ बुद्धिबळपटूंविरुद्ध सामने खेळले. रोटरी क्लब, ठाणे मिडटाउन आणि अपस्टेप अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या सामन्यांत अपेक्षेप्रमाणे आनंदने विजय नोंदवले. वेद आम्ब्रे आणि अथर्व आपटे या युवकांनी आनंदसमोर आव्हान उपस्थित केले. मात्र, अखेरीस आनंदला विजय मिळवण्यात यश आलेच. परंतु, या दोघांना पराभूत केल्यानंतर आनंदने त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही कोणती चाल रचली पाहिजे होती आणि त्यामुळे पुढे विजयाची संधी कशी निर्माण झाली असती याबाबत आनंदने त्यांना मार्गदर्शन केले. तसेच आनंदने हे प्रदर्शनीय सामने खेळणारे बुद्धिबळपटू आणि उपस्थित बुद्धिबळप्रेमींना स्वाक्षऱ्या दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने